Join us  

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून पडूनही तरुण बचावला, रुग्णालयात उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:59 AM

वरळी सी-लिंकवरून २३ वर्षीय तरुण गुरुवारी समुद्रात पडल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्याचा शोध सुरू असताना दादर चौपाटीच्या किना-याजवळ तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. निखार जगदीश साहू असे त्याचे नाव असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला की सेल्फीच्या नादात तो समुद्रात पडला याचा वरळी पोलीस शोध घेत आहेत.

मुंबई : वरळी सी-लिंकवरून २३ वर्षीय तरुण गुरुवारी समुद्रात पडल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्याचा शोध सुरू असताना दादर चौपाटीच्या किना-याजवळ तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. निखार जगदीश साहू असे त्याचे नाव असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला की सेल्फीच्या नादात तो समुद्रात पडला याचा वरळी पोलीस शोध घेत आहेत.साहूकडे सापडलेल्या आधार कार्डावरून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी सकाळी त्याने वांद्रे हिल रोडवरून वांद्रे वरळी सी-लिंक फिरण्यासाठी मोहंमद शकील याची टॅक्सी (एमएच ०३ एएक्स ०३७८) पकडली. वरळी सी-लिंक फिरून पुन्हा हिल रोडकडेच सोडण्याबाबत त्याने टॅक्सीचालकाला सांगितले. सव्वा अकराच्या सुमारास साहू वरळी सी-लिंकवर पोहोचला. फोटो काढायचे असल्याचे सांगून साहूने टॅक्सी थांबविण्यास सांगितले. साहू उतरल्यानंतर टॅक्सी बाजूला लावण्यासाठी टॅक्सीचालक पुढे गेला. टॅक्सी पुढे लावून मागे पाहत असताना साहू गायब असल्याचे दिसले. त्याने खाली पाहिले तेव्हा साहू समुद्रात पडल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षास माहिती दिली.घटनेची वर्दी लागताच वरळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी साहूचा शोध सुरू केला. दोन तासांनंतर दादर चौपाटीच्या किनाºयालगत तो बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरूअसून अद्याप त्याचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. त्याने आत्महत्येसाठी समुद्रात उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे सेल्फीच्या नादात तो समुद्रात पडल्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी घटनेची नोंद करत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे गजानन देसुरकर यांनी दिली.‘रुको जरा.. मुझे फोटो निकालना है...’टॅक्सीचालक मोहंमद शकीलने दिलेल्या जबाबानुसार, साहूने ‘हिल रोडवरून वांद्रे वरळी सी-लिंक घुमनेका है..’ असे सांगत टॅक्सी पकडली. अशात पुढे कुठे जाणार याबाबत साहूला विचारताच त्याने लोणावळ्याला जाणार असल्याचे सांगितले. मात्र त्याने पुन्हा हिल रोड येथेच सोडण्याबाबतच आग्रह धरल्याचेही टॅक्सीचालकाचे म्हणणे आहे. सी-लिंकवर टॅक्सी येताच ‘रुको जरा.. मुझे फोटो निकालना है..’ असे सांगत साहू खाली उतरला आणि टॅक्सी पुढे लावून मागे वळून पाहिले तोपर्यंत साहू समुद्रात पडल्याचे शकीलने सांगितले.

टॅग्स :मुंबई