मुंबई : चार जण माझ्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे सांगत त्यांची नावे ‘फेसबुक’वर पोस्ट करून विकेश विश्वकर्मा (२४) या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी संध्याकाळी बोरीवली आणि कांदिवलीदरम्यान रेल्वेरुळावर घडला. या प्रकरणी बोरीवली लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.विकेश हा कांदिवलीच्या पोईसर परिसरातील रहिवासी होता. त्याला तीन भाऊ आहेत. एका मोबाइल कंपनीसाठी तो काम करत होता. २३ जुलै रोजी त्याने यासंदर्भातील पोस्ट ‘फेसबुक’वर टाकली. पोस्टमध्ये त्याने ‘संदीप चौबे, रोशन चौबे, प्रवीण झा, पद्माकर सिंग इनलोग मेरे मौत के जिम्मेदार है’ असे लिहिले. त्यानंतर तो गायब झाला. त्यामुळे घरच्यांनी त्याला शोधण्यास सुरुवात केली. मंगळवारी त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकेशने कोणाकडून तरी व्याजाने पैसे घेतले होते. मात्र ते परत करू न शकल्याने त्याच्या डोक्यावर कर्ज झाले होते. त्यातच या चौघांनी त्याला मारहाण केली होती. तेव्हा ‘तुम्हाला मी चांगलाच धडा शिकवेन,’ अशी धमकीदेखील त्याने दिल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच काही लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘फेसबुक’ पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 05:48 IST