इंजिनीअर तरुणीही रील्स स्टारच्या जाळ्यात; लग्नाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:47 IST2025-12-02T09:46:13+5:302025-12-02T09:47:37+5:30
काही दिवसांनंतरही पैसे न मिळाल्याने तिने मार्च महिन्यात भांडुप पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाताच शैलेशने ३ लाख रुपये दिले, पण नंतर तो...

इंजिनीअर तरुणीही रील्स स्टारच्या जाळ्यात; लग्नाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक
मुंबई : सोशल मीडियावर 'रील्स स्टार' म्हणून लाखो फॉलोवर्स असलेल्या शैलेश रामुगडे (३१) ने रामुगड (३१) न मुंबईतील आयटी इंजिनीअर तरुणीलादेखील प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे स्वप्न दाखवले. पुढे तिची २२ लाख रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी भांडुप पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अशाच प्रकारे ९२ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी त्याला गेल्या महिन्यात बेड्या ठोकल्या होत्या. तो न्यायालयीन कोठडीत असून त्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले.
लाखोच्या संख्येने फॉलोअर्स
भांडुप परिसरात राहणारी ३० वर्षीय तरुणीची जानेवारी २०२३ मध्ये इंस्टाग्रामवरून शैलेशशी ओळख झाली. फॉलोअर्सच्या लाखोच्या संख्येमुळे हायप्रोफाईल जीवन जगणाऱ्या शैलेशने तिच्याशी फोनवर संपर्क वाढवत प्रेम व्यक्त केले.
फेब्रुवारी २०२३ मध्ये दोघांची वाशी येथे भेट झाली आणि तेथून भेटीगाठी वाढत गेल्या. काही दिवसांतच त्याने लग्नाची मागणीही घातली. मुलीने होकार दिला आणि शैलेशने तिच्या घरी येऊन तिच्या आईशी लग्नाबाबत चर्चा केली. त्यामुळे मुलीचा त्याच्यावर विश्वास बसला.
पुढे, शैलेशने फोटोशूटसाठी पैसे पाहिजेत सांगून दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर बीएमडब्ल्यू कार घेण्याचे स्वप्न दाखवत तिच्या नावाने कार बुक केली गेली. डाउन पेमेंट, टोकन मनी, डीलरला एनईएफटी अशा मिळून सुमारे ९ लाखांपेक्षा अधिक रक्कम दिली.
पुढे वडिलांचे आजारपण, नवीन कंपनीच्या नावाने पैसे उकळले. २७ फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान तिने शैलेशला एकूण २७ लाख रुपये दिले. त्याने त्यापैकी फक्त ५ लाख रुपये परत केले.
अटकेची माहिती मिळताच पोलिसांत
यादरम्यान ठाण्यात दुसऱ्या एका मुलीने शैलेशविरुद्ध फसवणुकीची तक्रार केल्याचे समजले. त्याने जेलममधून बाहेर आल्यानंतरही लग्नाबद्दल बोलणे सुरू ठेवले.
काही दिवसांनंतरही पैसे न मिळाल्याने तिने मार्च महिन्यात भांडुप पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाताच शैलेशने ३ लाख रुपये दिले. उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करत गायब झाला.
त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विष्णूनगर पोलिसांनी अटक केल्याचे समजताच तिला धक्का बसला. तिनेही पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. दरम्यान, आरोपीचा ताबा घेण्यासाठी अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले.