Join us  

निकाल हाती मिळण्याआधीच पुनर्परीक्षेचा अर्ज भरावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:54 AM

मार्कशीटची प्रत हाती आलेली नसतानाही विद्यार्थ्यांना वेबसाइटवरून मार्कशीट डाउनलोड करून अर्ज भरण्यास सांगितले जात आहे.

मुंबई : विधि शाखेच्या चुकीच्या व रखडलेल्या निकालांमुळे आधीच तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना आता मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा सामना करावा लागत आहे. लेखी परीक्षेत पास होऊनही प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेल्या एल.एल.एम. सेमिस्टर ३च्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुनर्परीक्षेचे (रिपीटर्स) अर्ज भरण्यास सांगितले आहे. मार्कशीटची प्रत हाती आलेली नसतानाही विद्यार्थ्यांना वेबसाइटवरून मार्कशीट डाउनलोड करून अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. ही विद्यापीठाची मुजोरी असल्याचा आरोप विधि शाखेच्या विद्यार्थ्यांनी केला असून, त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे.विधि अभ्यासक्रमाचे निकाल वेळेत न लागल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना निकाल हाती न येताच पुनर्परीक्षा द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षेत पास होऊन प्रॅक्टिकलमध्ये नापास कसे करण्यात आले, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.घाईघाईत निकाल लावण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून नापास केले जात असेल तर हे भयंकर आहे. विद्यार्थ्यांच्या या संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. विद्यापीठाने याची जबाबदारी घेत पेपर तपासणीची प्रक्रिया पुन्हा पार पाडायला हवी. मात्र, त्याऐवजी विद्यापीठ त्यांना पुनर्परीक्षेचे अर्ज भरण्यासाठीची नोटीस देत आहे. म्हणजे विद्यापीठ आपली चूक झाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अ‍ॅड. यज्ञेश कदम यांनीकेला आहे.योग्य तपास होणे गरजेचेविद्यार्थी लेखी परीक्षेत पास होतात आणि प्रॅक्टिकलमध्ये नापास होतात, हे कसे शक्य आहे. निकाल हाती लागण्याआधीच त्यांना पुनर्परीक्षेसाठी अर्ज भरायला लावले जाते, हे प्रकरण संशयास्पद आहे. या पूर्ण प्रकरणाचा योग्य तपास होणे गरजेचे आहे. यावर योग्य कार्यवाही न झाल्यास दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.- अ‍ॅड. यज्ञेश कदम, वकील, मुंबई उच्च न्यायालय

टॅग्स :परीक्षा