Join us  

यंदाच्या वर्षी नियामक मंडळाची बैठक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:02 AM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने साठ तासांचे नाट्य संमेलन आयोजित करीत सर्वांकडून कौतुकाची थाप पाठीवर घेतली खरी; पण काही नवीन पायंडे पाडताना परंपरेलाही छेद देण्याचा प्रयत्न या वेळी झाला.

- नम्रता फडणीसमुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने साठ तासांचे नाट्य संमेलन आयोजित करीत सर्वांकडून कौतुकाची थाप पाठीवर घेतली खरी; पण काही नवीन पायंडे पाडताना परंपरेलाही छेद देण्याचा प्रयत्न या वेळी झाला. संमेलनाच्या समारोपापूर्वी दरवर्षी होणारी नियामक मंडळाची बैठक बंद करणे हा त्याचाच एक भाग; परंतु ही बैठक यंदा होणार नसल्यामुळे बाहेरगावच्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी समारोपाकडेच पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे.दरवर्षी नाट्य संमेलनाच्या समारोपात खुल्या अधिवेशनाच्या माध्यमातून ठराव मांडले जाण्याची प्रथा आहे. मात्र, हे ठराव मांडण्यापूर्वी समारोपाच्या दिवशी सकाळी नियामक मंडळाची एक तातडीची बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये कोणते ठराव मांडले जावेत, यावर एक साधकबाधक चर्चा होऊन सूचक आणि अनुमोदकाच्या द्वारे ठरावांवर शिक्कामोर्तब केले जाते. मात्र, यंदा समारोपाच्या दिवशी कोणतीच बैठक होणार नसल्याचे मंडळाच्याच काही सदस्यांनी सांगितले. ही बैठकच होणार नसल्याने मग समारोपाला येण्याचे प्रयोजनच काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र, आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही संमेलनाच्या समारोपाला नाही, असे सांगून काही सदस्यांनी हात वर केले आहेत.शासनाचा प्रतिनिधी या नात्याने तावडे यांनीच संमेलनाच्या समारोपात ठराव नुसते मांडण्यापेक्षा या मागण्यांची पूर्तता करून ते खुल्या अधिवेशनात मांडू, असा सल्ला एक महिन्यापूर्वी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये दिला होता. विशेष म्हणजे तावडे यांच्या या मागणीला सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानुसार मंडळाकडे आलेल्या ठरावांवर त्याच बैठकीत चर्चा झाली आणि त्याच मंजूर ठरावांचे समारोपाच्या व्यासपीठावर वाचन करण्याचा सोपस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.नाट्य परिषदेची घटनादुरुस्ती करून हा बदल करण्यात आला आहे. संमेलन तारखा जाहीर करण्याच्या महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीतच आलेल्या ठरावांवर चर्चा झाली. त्यानुसार समारोपामध्ये फक्त मंजूर ठरावांचे वाचन केले जाणार आहे.- सतीश लोटके, सहकार्यवाह, मध्यवर्ती नाट्य परिषद

टॅग्स :९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनमराठी