Join us  

यंदा आरटीईच्या ४० हजार २०५ जागा रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 3:27 AM

अंतिम मुदत संपली : नियोजनाबाबत पालक असमाधानी

मुंबई : आरटीईच्या तिसऱ्या आणि अंतिम फेरीची मुदत आज संपली. तिसºया फेरीअखेर राज्यात आरटीईचे केवळ ६५ टक्के प्रवेश झाल्याने यंदा ४० हजार २०५ जागा रिक्त राहणार आहेत.

शाळा व्यवस्थापनाकडून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत रिक्त जागांवर प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत असल्याचे मत आरटीई प्रवेशासाठी लढा देणाºया संघटना व्यक्त करीत आहेत.

मुंबईतील आरटीई प्रवेशाची स्थिती पाहता केवळ ४५ टक्के जागांवरच प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. येथील ३५६ शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या एकूण ७,४९१ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ६,४५३ अर्जांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. ३,३८९ जागांवर प्रवेश निश्चिती झाली असून, त्यातील २,४६८ पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. १०१ अर्जांवरील प्रवेश अन्य कारणाने नाकारण्यात आले आहेत, तर ४९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहेत.

शाळा सुरू झाल्यानंतर प्रवेश कोण घेणार?दर्जेदार शिक्षण घेणे ही सामान्यांच्या आवाक्यातील गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे आरटीईत प्रवेश झाला, तर आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळेल, अशी पालकांची अपेक्षा असते. मात्र, दरवर्षी आरटीईची प्रवेशप्रक्रिया उशिरा सुरू होते. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आल्यावर आरटीई प्रवेशाची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे. प्रवेशाच्या वेळी शाळाही अनेक प्रकारच्या त्रुटी काढून बालकांचे प्रवेश नाकारत असल्याच्या प्रतिक्रिया पालक देत आहेत.

ठाण्यात सर्वांत कमी प्रवेशराज्यातील सगळ्यात जास्त जागा उपलब्ध असलेल्या पुण्यात १३,३०९ जागांवर प्रवेश झाले आहेत. तेथे आरटीईच्या १६,५९४ जागा उपलब्ध होत्या. तर ठाण्यात आरटीई प्रवेशासाठी १३,४०० जागा उपलब्ध असूनही तिसºया फेरीअखेर केवळ ५,८११ प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेशाची ही शेवटची फेरी होती. पुढील वर्षी काही बदल झाल्यास, त्यासह आणखी लवकर प्रवेश प्रक्रिया राबविण्याची तयारी करू, अशी माहिती शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

टॅग्स :शिक्षण हक्क कायदा