सरत्या वर्षाला निरोप : काही घटनांनी उमटविला ठसा !टीम लोकमत : मुंबई - मुंबईकर ओळखला जातो तो त्याच्या स्पिरीटसाठी... अनेक आघात व कष्ट सहन करून दररोज नव्या दमाने सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यास मुंबईकर सदैव तत्पर असतो... करोडो मुंबईकर नव्या वर्षाचे नव्या दमाने स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत... असे असले तरी सरत्या वर्षातील मुंबईसह मुंबईकरांवर दीर्घकाळ स्मरणात राहू शकतील अशा २०१४ या वर्षातील निवडक १४ घटना शेवटच्या दिवशी आम्ही ‘लोकमत’च्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. या घटनांचे साद-पडसाद पुढील अनेक वर्षे पडत राहतील. विविध क्षेत्रातील असल्या तरी कोणत्या का निमित्ताने होईना, या घटनांवर २०१४चा शिक्का असणार आहे... तेव्हा जुन्या वर्षाला अलविदा म्हणताना त्याच्या आठवणींना इतिहासाच्या पानावर कोरून आपण नवीन वर्षाचे स्वागत करू या़़मुंबईवर पायाभूत सुविधांची खैरातगेली अनेक वर्षे मुंबईकर प्रतीक्षेत असलेल्या पायाभूत सुविधांना २०१४चा मुहूर्त मिळाला़ सार्वजनिक वाहतुकीचा नवीन पर्याय म्हणून मेट्रो व मोनो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली़ मेट्रोने पश्चिम व पूर्व महानगरे जोडली गेली़ याचा उद्घाटन सोहळाही आघाडी सरकारने घाईघाईत उरकला़ त्याआधी सुरू झालेल्या मोनोला जॉय राईड म्हणून मुंबईकरांनी स्वीकारले़ यासोबत मुंबईतून बाहेर पडण्यासाठी ईस्टर्न फ्री-वे बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खुला झाला़ पश्चिम दु्रतगती मार्गाने थेट टी-२ जोडणारा मार्ग मुंबईकरांना मिळाला़ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रशस्त अत्याधुनिक टी-२ मुुंबईकरांसाठी खुले झाले़ या प्रकल्पांमध्ये सर्वाधिक लक्षणीय ठरली ती म्हणजे मेट्रो़ आयएनएस युद्धनौका नौदलाच्या ताफ्यातआॅगस्ट १६ रोजी आयएनएस कोलकोता नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील डॉकयार्डमध्ये झालेल्या एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस कोलकोता नौदलाला सुपुर्द करीत असल्याचे सांगितले. १६४ मीटर लांब, १८ मीटर रुंद आणि ७,५00 टन वजनाच्या या जहाजावर १६ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे, चेतक, सी-किंग, कामोव्ह हॅलिकॉप्टर, छोट्या तोफा व अन्य युद्धशस्त्रे आहेत. या युद्धनौकेची किंमत ११ हजार कोटी रुपये एवढी आहे. दुप्पट भाडेवाढीचा रेल्वेचा अजब निर्णय२५ जून २0१४पासून रेल्वेच्या भाड्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. यात प्रामुख्याने मासिक पासांत वाढ करण्यात आली़ याचा धसका घेतलेल्या मुंबईकरांनी या भाडेवाढीची अंमलबजावणी होण्याआधीच आपल्या मासिक पासांची मुदत वाढवून घेतली़ या भाडेवाढीविरोधात न्यायालयाचेही दार ठोठावण्यात आले़ अखेर वाढता जनक्षोभ बघून मोदी सरकारने ही भाडेवाढ मागे घेतली़ मात्र ही भाडेवाढ मागे घेताना सेकंड आणि फर्स्ट क्लासवर भाडेवाढ फक्त १४.२ टक्केच केली आणि लोकल तिकिटांसाठी ८0 कि.मी. प्रवासापर्यंतच्या भाड्यात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. मोनिका मोरेला अपघातनेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी घाटकोपर येथील फलाट क्रमांक २ येथून गाडी पकडताना झालेल्या अपघातात कुर्ला येथे राहणाऱ्या मोनिका मोरे हिला दोन्ही हात गमवावे लागले. ११ जानेवारी रोजी तिचा अपघात झाला, यानंतर ७ महिने तिच्यावर उपचार सुरू होते. मोनिकावर शस्त्रक्रिया झाल्यावर तिला कृत्रिम हात बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतामध्ये पहिल्यांदाच बोटे हलणारे कृत्रिम हात हे मोनिकाला बसवले आहेत. २० जुलै रोजी मोनिकाला केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता फेब्रुवारी २०१५मध्ये मोनिका बारावीची परीक्षा देणार आहे.डेंग्यूचा विळखा : स्वच्छ पाण्यात पैदास होणाऱ्या एडिस इजिप्ती डासांमुळे होणाऱ्या डेंग्यूमुळे मुंबईकर २०१४ सालामध्ये हैराण झाले होते. सरत्या वर्षात डेंग्यूचे १० बळी गेले असून, ६ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या डेंग्यूने ४ महिन्यांच्या सामिया शेख या मुलीचाही बळी घेतला. पावसाला उशीर झाल्याने जुलै - आॅगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी वाढलेला डेंग्यूचा जोर हा नोव्हेंबर महिन्यातही कायम होता. डेंग्यूचे डिसेंबर महिन्यातही रुग्ण आढळून आले आहेत.नामदेव ढसाळ यांचे निधनदलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले व साहित्यिक क्षेत्रावर शोककाळा पसरली़ परदेशातही ढसाळ यांचे साहित्य गाजले व त्याची दखलही तितक्याच गांभीर्याने घेतली गेली़ भारत सरकारने त्यांच्या साहित्याचा गौरव करताना ढसाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले़ ‘गोलपीठा’, ‘मुर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’, ‘तुही यत्ता कंची’ या कवितासंग्रहांनी ढसाळ यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली़ दलितांचे, शोषितांचे जीवन स्वत: अनुभवलेला, भोगलेला हा लेखक, कवी, कादंबरीकार या वर्षाच्या सुरुवातीलाच काळाच्या पडद्याआड गेला़हातेकरांचे निलंबन आणि विद्यापीठाची नाचक्कीमुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांनी थेट कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्यावर टीका केल्याने विद्यापीठाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच त्यांना निलंबित केले. यामुळे विद्यापीठाची सर्वच स्तरातून नाचक्की झाली. हातेकर यांच्या निलंबनाचे पडसाद दीक्षान्त समारंभातही उमटले. कुलगुरू नमती भूमिका घेत नसल्याने अखेर हातेकर यांनी विद्यापीठाच्या गेटबाहेर लेक्चर सुरू केले होते. इस्थेर आणि प्रीतीचे मारेकरी गजाआडदेशभर गाजलेले इस्थेर अनुह्या हत्याकांड व प्रीती राठी अॅसिड हल्ला या दोन गुन्ह्यांचा मुंबई गुन्हे शाखेने अचूक तपास करून आरोपी गजाआड केले. दोन्ही प्रकरणांमध्ये वेगाने व अचूक दिशेने तपास होईल असा एकही दुवा, पुरावा नव्हता.टाटाच्या विजेचा मुंबईत २५ वर्षांसाठी शिरकाव मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात पुढील २५ वर्षे वीज वितरण करण्यासाठीचा परवाना राज्य वीज नियामक आयोगाकडून टाटा पॉवर वीज कंपनीला १५ आॅगस्ट रोजी मंजूर केला. टाटा पॉवर कंपनीला १९१६ साली १०० वर्षांसाठी मुंबईत वीज वितरणाचा परवाना मंजूर झाला होता. परंतु २००३च्या कायद्यानुसार वीज वितरण परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक होते. त्यामुळे कंपनीने आयोगाकडे अर्ज दाखल केला. या स्पर्धेत महावितरणसारखी तगडी कंपनीही सहभागी झाली होती. खोत हरपले़़़‘उभयान्वयी अव्यय’, ‘बिनधास्त’, ‘विषयांतर’ अशा साहित्यकृतींनी साहित्यविश्व ढवळून काढणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे १० डिसेंबर रोजी निधन झाले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने साहित्यविश्व ढवळून काढणाऱ्या या साहित्यिकाचे चिंचपोकळी येथील सानेगुरुजी मार्गावरील साई मंदिरात वृद्धापकाळाने निधन झाले. एकेकाळचे राजबिंडा साहित्यिक चंद्रकांत खोत गेली कित्येक वर्षे विपन्नावस्थेत बेघर जगत होते. नेमाडे यांची वाणीकोसलाकार आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनावर परखड टीका केली. ‘साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग’ असल्याचे त्यांनी म्हटले. या ‘नेमाडेवाणी’मुळे मुंबईसह महाराष्ट्रातील साहित्य विश्व ढवळून निघाले. एका पुरस्कार सोहळ्यात नेमाडे म्हणाले, राजकारणी आणि उद्योजकांकडून साहित्य संमेलनांसाठी पैसे घेतात. संमेलनासाठी शत्रूकडूनही पैसे घेतील असेही त्यांनी म्हटले. शहाणपणाला मर्यादा असते, पण मूर्खपणाला मर्यादा नसते, असे रोखठोक बोल त्यांनी सुनावले. सीएनजी पंपांवर बंदीची कारवाई : पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या कमिशनवाढीसाठी बंद पुकारणाऱ्या पंप चालकांना शासनाच्या वैध मापन शास्त्र विभागाने काही सीएनजी पंपांवर बंदीची कारवाई करीत दणका दिला. नियमानुसार गेल्या १० वर्षांपासून स्टँपिंग आणि मॉडेल अप्रूव्हल प्रमाणपत्राच्या रूपात पंप चालक आणि तेल कंपन्यांनी शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा या विभागाचा आरोप होता. यानंतर प्रशासनासमोर नमते घेत मुंबईतील सीएनजी पंप चालकांनी हा भुर्दंड भरण्यासाठी तेल कंपन्यांना भाग पाडले.सर्व झोपडपट्ट्यांना पाणीगेली अनेक वर्षे रखडलेला सरसकट सर्व झोपड्यांना पाणीपुरवठ्याचा प्रश्न वर्ष सरता-सरता मार्गी लागला़ उच्च न्यायालयानेच जाब विचारल्यानंतर बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरलेल्या मुंबई महापालिकेने पाणीपुरवठा करण्यातच धन्यता मानली आहे़ सरसकट सर्वच झोपड्यांना पाणी मिळाल्यास पाणी चोरी आणि गळती कमी होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे़ मात्र तूर्तास याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे़