Join us  

पर्यावरणशास्त्र विषयाची लेखी परीक्षा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:55 AM

अकरावी आणि बारावीला पर्यावरणशास्त्र विषयाची घेण्यात येणारी ५० गुणांची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

मुंबई : अकरावी आणि बारावीला पर्यावरणशास्त्र विषयाची घेण्यात येणारी ५० गुणांची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रकल्प आणि प्रकल्प वही किंवा कार्यशाळेत सहभागी व्हावे लागणार आहे. नवीन गुणपद्धतीनुसार लेखी परीक्षेऐवजी प्रकल्पाला ३० गुण असतील आणि कार्यशाळा किंवा प्रकल्प वहीसाठी २० गुण निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी अ ते ड यापैकी श्रेणी देण्यात येणार आहेत.शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता अकरावीसाठी आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता बारावीसाठी अंतिम मूल्यमापन हे ६५० ऐवजी ६०० गुणांचे राहील. सद्य:स्थितीतील पर्यावरणशास्त्र विषयास देण्यात येणाऱ्या ५० गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल; तसेच पर्यावरणशास्त्र या विषयामध्ये जलसुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट राहील, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्याप्रमाणे विभागीय मंडळांना सूचना देऊन मूल्यांकन पद्धती राबविण्याचेही कळविण्यात आले होते. मात्र शिक्षण विभागाने आता या मूल्यांकन पद्धतीत बदल करून त्यासंबंधीचे शुद्धिपत्रक जारी केले आहे.याचसोबत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांच्या परीक्षेत सहामाही आणि वार्षिक परीक्षा अशा दोन्ही स्तरांवर ३० गुण प्रात्यक्षिक परीक्षांसाठी असल्याचे यापूर्वीच्या योजनेत नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत होत्या.आता मात्र सहामाहीला प्रात्यक्षिकांची तरतूद रद्द करण्यात आली असून फक्त वार्षिक परीक्षेला प्रात्यक्षिकाचे ३० गुण असणार आहेत. याशिवाय गृहविज्ञान विषय घेणाºया विद्यार्थ्यांना यापुढे वस्त्रशास्त्र, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, गृहव्यवस्थापन, बालविकास यापैकी दोनच विषय घेता येतील.अकरावी व बारावीसाठी लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट केले आहे.तसेच अंतर्गत मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न करता पूर्ण वर्षभरात करण्याची मुभा राहील. यासंदर्भातील नियोजन कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक शाळा स्तरावर करता येणार आहे.>लेखी परीक्षेत २५ टक्के बहुपर्यायी प्रश्नअकरावीची वार्षिक परीक्षा अकरावीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व बारावीची वार्षिक परीक्षा बारावीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील. बीएसई मंडळाच्या धर्तीवर लेखी परीक्षेत किमान २५ टक्के बहुपर्यायी/ वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे.