Join us  

सलून टाकण्यासाठी केली महिला अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 1:19 AM

मुंबई : भारतीय नागरीक म्हणून अनोळखी व्यक्तीस मदत करणे जम्मू काश्मीरच्या वैद्यकीय अधिकारी महिलेला भलतेच महागात पडले आहे. आरोपीने ...

मुंबई : भारतीय नागरीक म्हणून अनोळखी व्यक्तीस मदत करणे जम्मू काश्मीरच्या वैद्यकीय अधिकारी महिलेला भलतेच महागात पडले आहे. आरोपीने उत्तरप्रदेशात सलून टाकण्यासाठी महिलेच्या फोटोमध्ये फेरफार केली आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळले. अखेर भीतीने महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणात गुन्हे शाखेने मोहम्मद ताबीस इरशाद अहमद मलिक (२६) याला अटक केली आहे.तक्रारदार या मुळच्या जम्मू काश्मीरच्या रहिवासी आहेत. त्या सौदी अरेबियातील तैफ शहरातील एका रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मलिक हा देखील येथीलच एका गारमेंट मॉलमध्ये नोकरीला होता.

आॅक्टोबर २०१७ मध्ये तक्रारदार खरेदीसाठी मॉलमध्ये गेल्या. तेव्हा त्यांची ओळख मलिकसोबत झाली. मलिकने भारतीय असल्याचे सांगून येथे पगार व्यवस्थित मिळत नसल्याचे सांगितले. आणि त्यांची सहानुभूती मिळवली. महिलेने देखील त्यांना भारतीय म्हणून वेळोवेळी मदत केली. त्यांच्या याच स्वभावाचा फायदा घेत, त्यांच्या मोबाईलमधील सर्व तपशील मिळवला.

आणि २६ आॅक्टोबर रोजी सौदीमधून एक्झिट व्हिसा घेत मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्याने महिलेच्या फोटोंमध्ये फेरफार केली. त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार केले. हेच फोटो तक्रारदार महिलेला पाठवून त्यांना ते सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली.

त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भितीने त्यांनी २० हजार रुपये दिले. पुढे पैशांची मागणी वाढत राहिली. मलिक सौदी अरेबियाचा मोबाईल क्रमांक वापरून व्हॉट्सअप करत होता. तिने त्याचा शोध घेतला, तेव्हा तो मुंबईत असल्याचे समजले. अखेर महिलेने मुंबई पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

याप्रकरणाचा गुन्हे शाखेच्या कक्ष ३ नेही समांतर तपास सुरु केला. आरोपीला बेड्या ठोकल्या. चौकशीत मलिक याला उत्तरप्रदेशात सलून टाकायचे असल्याने त्याने हा प्रताप केल्याचे पोलिसांनी सांगितले.