Join us  

चेंबूरमधील महिला मृत्यू प्रकरण; म्हणे ‘त्या’ महिलेचा मृत्यू वा-यामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:41 AM

चेंबूरमध्ये महिलेच्या मृत्यूस कारणीभूत झाड पडण्यास वारा जबाबदार असल्याचा अजब निष्कर्ष महापालिकेने चौकशी अहवालातून काढला आहे.

मुंबई : चेंबूरमध्ये महिलेच्या मृत्यूस कारणीभूत झाड पडण्यास वारा जबाबदार असल्याचा अजब निष्कर्ष महापालिकेने चौकशी अहवालातून काढला आहे. पालिकेने अशी जबाबदारी झटकल्यामुळे मृत महिलेच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत आता पालिका महासभेतच आवाज उठविण्यात येणार असल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले.चेंबूर स्वस्तिक पार्क येथील चंद्रोदय सोसायटी येथील नारळाचे झाड अंगावर पडल्याने, एका निवेदिकेचा जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. या धोकादायक झाडाची तक्रार करूनही पालिकेने दुर्लक्ष केल्याने, महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व मृत महिलेच्या पतीने केला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पालिकेने सुरू केली होती. याबाबतचा अहवाल नुकताच चौकशी अधिका-यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांना सादर केला आहे. मात्र, या अहवालातील पालिकेच्या तर्काने सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे.या महिलेच्या मृत्यूचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटल्यामुळे, त्या वेळी ते झाड मजबूत असल्याचा अहवाल देत पालिकेने आपला बचाव केला होता. मात्र, आता दिलेल्या अहवालात हे झाड सोसाट्याच्या वा-यामुळे पडल्याचे सांगत, पालिका अधिकाºयांनी आपली जबाबदारी झटकली आहे. चंद्रोदय सोसायटीकडून करण्यात आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून आले होते. प्रत्येक वॉर्डमध्ये उद्यान खात्याच्या अधिकाºयांनी झाडांची पाहणी करणे आवश्यक असते. त्यांच्या परवानगीशिवाय वृक्ष छाटणी करता येत नसल्याने, पालिका प्रशासनाला जबाबदारी झटकता येणार नाही, अशी भूमिका सभागृह नेते यशवंत जाधव यांनी घेतली आहे.तिकीट खिडकीवरील स्लॅब महिलेवर कोसळला-अंधेरी स्थानकात तिकीट खिडकीवरील स्लॅब महिलेच्या डोक्यावर कोसळल्याने ही महिला जखमी झाली. आशा मोरे (५६) असे या महिलेचे नाव आहे. तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असताना हा प्रकार घडला.अंधेरी स्थानकात पूर्वेकडे तिकीट काढण्याच्या रांगेत उभ्या असताना, आशा यांच्या डोक्यावर स्लॅबचा काही भाग कोसळला. रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर शुद्ध हरपून आशा या जमिनीवर कोसळल्या. रांगेतील अन्य प्रवाशांनी तत्काळ स्थानकावरील रुग्णवाहिकेतून त्यांना कुपर रुग्णालयात दाखल केले.त्यांच्या डोक्यावर २७ टाके घातले. प्राथमिक मदत म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाने पाचशे रुपये दिले. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपचारांचा खर्च रुग्णालय प्रशासनाला देण्यात येणार आहे, तसेच संबंधित महिलेचे सिटी स्कॅन करून अन्य चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातांमुळे पुन्हा एकदा लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका