Join us  

एल्फिन्स्टन स्थानकात डोक्यावर टाइल्स पडून महिला प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:23 AM

एल्फिन्स्टन स्थानकातील तिकीट खिडकीजवळील चौकटीवरील टाइल्स डोक्यावर पडून, महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

मुंबई : एल्फिन्स्टन स्थानकातील तिकीट खिडकीजवळील चौकटीवरील टाइल्स डोक्यावर पडून, महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. अनिता बसाक (३८) असे जखमी महिलेचे नाव आहे. तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे स्थानकावरील गलथान कारभार समोर आला आहे.चेंबूर येथे राहणा-या अनिता बसाक (३८) या शुक्रवारी दुपारी कामानिमित्त एल्फिन्स्टन येथे आल्या होत्या. या वेळी तिकीट खिडकीजवळील चौकटीवरील टाइल्स त्यांच्या डोक्यावर पडली. पावणे चार वाजता ही दुर्घटना घडली. स्थानकावरील रेल्वे पोलीस आणि सुरक्षा बलाच्या जवानांसह स्थानकावरील रुग्णवाहिकेतून अनिता यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेच्या डोक्यावर दोन टाके घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उपचारानंतर शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांना घरी सोडण्यात आले. एल्फिन्स्टन दुर्घटनेला महिनाही पूर्ण होत नाही, तोच स्थानकावर दुसरी दुर्घटना घडली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :एल्फिन्स्टन स्थानकमुंबई लोकल