Join us  

लोकल प्रवासात हरवलेली कल्याणची महिला सापडली राजस्थानला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 7:12 AM

कल्याण ते मुंब्रा या लोकल प्रवासातून अचानक बेपत्ता झालेली कल्याणमधील २० वर्षीय विवाहिता थेट राजस्थानला सापडली. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्या विवाहितेने आपल्या नातेवाइकांना

पंकज रोडेकर 

ठाणे : कल्याण ते मुंब्रा या लोकल प्रवासातून अचानक बेपत्ता झालेली कल्याणमधील २० वर्षीय विवाहिता थेट राजस्थानला सापडली. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्या विवाहितेने आपल्या नातेवाइकांना केलेल्या एका मोबाइल फोनच्या आधारे तिचा शोध घेऊन तिला सुखरूपरीत्या शुक्रवारी तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. तसेच वारंवार होणारे कौटुंबिक क लह आणि स्वत:च्या कुपोषित बाळाच्या पालन-पोषणामुळे ती त्रासलेली होती. त्यातूनच तिने पळ काढल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.

कल्याण येथे राहणारी विवाहिता रेश्मा (नाव बदलले आहे) ही मुलावर उपचारार्थ मुंब्य्रातील रुग्णालयात आपल्या सासूसोबत ३ सप्टेंबर रोजी निघाली. त्या दोघी कल्याण रेल्वे स्थानकातून धिम्या लोकलने मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत एकत्र आल्या. मुंब्रा रेल्वे स्थानक आल्यावर महिलेची सासू फलाटावर प्रथम उतरली. नंतर तिने मुलाला सासूकडे दिले. मात्र, ती लोकलमधून खाली न उतरता तशीच पुढे गेली. दरम्यान, दररोज कटकटीला कंटाळलेल्या रेश्माला लोकल प्रवासात एक राजस्थानी महिला भेटली. तिने त्या महिलेला आपण गरीब असून आपल्याला कोणी नाही. तसेच काही काम मिळेल का, अशी विचारणा केली. त्या महिलेलाही राजस्थान येथे घरकामासाठी कोणीतरी महिला पाहिजे होती. रेश्माने विनंती केली म्हणून त्या महिलेने तिला आपल्या सोबत राजस्थानला नेले. रेश्मा घरी परत आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाची स्थापना करून शोधकार्य सुरू केले. तोच राजस्थानवरून हरवलेल्या महिलेच्या नातेवाइकांना एका अज्ञात महिलेचा फोन आला. तिने राजस्थानमध्ये एक महिला पडल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी त्या फोनवर पुन्हा फोन केला. पण तिने मोबाइल बंद करून ठेवला होता. या संशयास्पद फोन कॉल्सची माहिती नातेकवाईकांनी पोलिसांना देताच पोलिसांनी त्या क्रमाकांच्या आधारे तपास सुरू केला असता तो फोन रेश्माला नेणाऱ्या महिलेचे असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेसह रेश्माला पोलीस ठाण्यात आणले आणि शुक्रवारी २५ दिवसांनी रेश्माला तिच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :मुंबई लोकलमहिला