Join us  

VIDEO : आमदारकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे १० कोटींची मागणी करणारी महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:44 PM

आमदारकीसाठी १० कोटी रुपये खर्च येईल. ही रक्कम टप्प्याटप्प्याने द्यावी लागेल. पाच कोटी रुपये आधी आणि पाच कोटी रुपये शपथविधीनंतर द्यावे लागतील.

ठाणे : विधान परिषदेच्या आमदारकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे १० कोटी रुपयांची मागणी करणाºया एका महिलेसह तिघांना ठाणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ठाण्याच्या एका नगरसेवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.कल्याण येथील गोविंदवाडीची रहिवासी अनुद सज्जाद शिरगावकर (२९), नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील अनिलकुमार शंकरलाल भानुशाली (३१) आणि पुण्यातील आळेफाटा येथील अब्दुल फय्याज अन्सारी (२४) ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. आरोपी अनिलकुमार भानुशाली याने जून-जुलै २०१८ मध्ये विधान परिषदेची आमदारकी मिळवून देण्याची बतावणी करून ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक-२ चे भाजपाचे नगरसेवक मनोहर जयसिंग डुंबरे यांच्याशी संपर्क साधला होता. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध आहेत, अशा थापा त्याने मारल्या. आमदारकीसाठी १० कोटी रुपये खर्च येईल. ही रक्कम टप्प्याटप्प्याने द्यावी लागेल. पाच कोटी रुपये आधी आणि पाच कोटी रुपये शपथविधीनंतर द्यावे लागतील, असेही त्याने डुंबरे यांना सांगितले. २५ वर्षांपासून राजकारणात असलेल्या डुंबरे यांना एकूणच प्रकार संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांना कळवला. मुख्यमंत्र्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आरोपींच्या अटकेसाठी डुंबरे यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत काम करणारी एक महिला आमदारकीसाठी मदत करणार असल्याचे अनिल भानुशाली याने डुंबरे यांना सांगितले. आमदारकीसाठी तुमच्या बायोडाटावर मुख्यमंत्र्यांची मंजुरी घ्यावी लागेल. महिलेच्या मदतीने ती मंजुरीही मिळून जाईल, असे तो म्हणाला. त्याच्या म्हणण्यावरून डुंबरे यांनी स्वत:चा बायोडाटा दिला. त्यानंतर, सोमवारी महिलेने डुंबरे यांना फोन करून त्यांचा बायोडाटा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला असल्याचे सांगितले. कॉन्फरन्स कॉलद्वारे मुख्यमंत्री स्वत: बोलणार आहेत, असेही तिने डुंबरे यांना सांगितले. त्यानंतर, पलीकडून दुसºया आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या आवाजात डुंबरे यांना महिला म्हणेल तसे काम करण्याचे आदेश दिले. बायोडाटा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यामुळे २५ लाख रुपयांचे टोकन तिने डुंबरे यांना मागितले. त्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घोडबंदर रोडवरील हॉटेल तुलसीमध्ये भेटण्याचे त्यांच्यात ठरले. डुंबरे यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर हॉटेल तुलसीमध्ये सापळा रचण्यात आला. तिथे बायोडाटावर मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी असलेली प्रत महिलेने डुंबरे यांना दिली. त्यानंतर, डुंबरे यांच्याकडून २५ लाख रुपये स्वीकारताच पोलिसांनी तिला अटक केली. महिलेची झडती घेतली असता तिच्याजवळ नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, भारत सरकारची चार ओळखपत्रे आढळली. सर्व ओळखपत्रांवर तिचे नाव आणि पत्ते वेगवेगळे आहेत. अनिल भानुशाली याला पोलिसांनी नवी मुंबईतील घणसोली येथून अटक केली. त्याच्याजवळ केंद्रीय दक्षता आयोगाची काही कागदपत्रे आढळली. या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी दिली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, संजू जॉन, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी महिला दहावी उत्तीर्ण असून तिन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप तरी समोर आलेली नाही. त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाजपोलिसांना या प्रकरणात अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव अब्दुल फय्याज अन्सारी असून तो नकलाकार आहे. आरोपी अनुद शिरगावकर हिच्या कॉन्फरन्स कॉलवर तो मुख्यमंत्र्यांच्या आवाजात डुंबरे यांच्याशी बोलला होता. तो एका गॅरेजमध्ये कामाला असून त्याला आवाजाची नक्कल करण्याची कला अवगत असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली. जास्त बोलल्यास समोरील व्यक्तीला शंका येईल, यासाठी फोनवर तो मोजकाच बोलला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

असा रंगला संवाद...१९ मार्च रोजी आरोपी महिला अनुद शिरगावकर हिने ठाण्याचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याशी मोबाइल फोनवर संपर्क साधला. मुख्यमंत्रीसाहेबांना कॉन्फरन्स कॉलद्वारे जोडत असल्याचे तिने डुंबरे यांना सांगितले. पलीकडून पुण्याचा अब्दुल फय्याज अन्सारी मुख्यमंत्र्यांच्या आवाजात बोलला. तिघांमध्ये झालेल्या २ मिनिटे ३६ सेकंदांचा हा तपशील...अनुद : हॅलो मनोहरजी, ले लू क्या लाइन पे। सर कुछ लोगो के साथ बैठे है, लेकीन उन्होने कहा है की लाइन पे ले लो करके।डुंबरे : हां... हां...(कॉन्फरन्स कॉलद्वारे तोतया मुख्यमंत्र्यांना जोडले जाते. काही सेकंदांतच मुख्यमंत्री कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी होतात.)अनुद : नमस्कार सर, अनुद बोल रही हंू।मुख्यमंत्री : हांअनुद : सर वो मनोहर डुंबरे जिनका बायोडाटा आपने अप्रूव्ह किया, वो लाइन पे है। थोडा बात किजीए ना।मुख्यमंत्री : हॅलोडुंबरे : सर नमस्कार, मनोहर डुंबरे बोलतोय ठाण्याहूनअनुद : सर वो अप्रूव्हल मै इनको कल दे देती हूं। सेकंड थिंग, वो कॅबिनेट मे फॉरवर्ड कर दूं ना, थोडे दिन मे जो मिटिंग है।मुख्यमंत्री : करून टाका जे काय आहे ते.अनुद : सेकंड थिंग, मनोहरजी को मैने अमाउंट बोला है। पच्चीस अभी इन अ‍ॅडव्हान्स देने वाले है। जो कुछ भी रहेगा, रेस्ट अमाउंट, वो आफ्टर जॉयनिंग रहेगा। टोटल अमाउंट फोर का है।मुख्यमंत्री : ओके. आपने बोला है ना उनको?अनुद : जी हां। बाकी सब बात हुआ है। मै उनसे कॅबिनेट मीटिंग का डिटेल फॉरवर्ड करती हूं, फिर मीटिंग मे आप बाकी बात कर लो, ओके मनोहरजी?डुंबरे : सर, मिलने के लिए आपकी अपॉइंटमेंट मिलेगी?मुख्यमंत्री : अनुद को मै बोलता हूं। अनुद आपको बोल देगी।डुंबरे : ठीक है, सर..अनुद : कॅबिनेट का मै करवाती हूं और उसके पहिले पॉसिबल रहा तो मै वर्षा हाउस पे करवाती हूं।डुंबरे : ठीक है। अभी आप वो अपॉइंटमेंट लेटर (डुंबरे बायोडाटाऐवजी चुकून अपॉइंटमेंट लेटर बोलतात) सिग्नेचर करके लाएगी ना?अनुद : बायोडाटा.. बायोडाटा डुंबरे : हां... बायोडाटा रेडी है ना सर?मुख्यमंत्री : हांअनुद : ओके सर.. मै कॉल बॅक करवाती हूं।मुख्यमंत्री : ओकेडुंबरे : ओके सर 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनिवडणूक