Join us  

महिलांना फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 4:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : धूम्रपान, तंबाखू, खेणी, हुक्का, रिव्हर्स स्मोकिंग, यामुळे सध्या महिलांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : धूम्रपान, तंबाखू, खेणी, हुक्का, रिव्हर्स स्मोकिंग, यामुळे सध्या महिलांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले असल्याचा निष्कर्ष न्युबर्ग सेंटर फॉर जेनॉमिक मेडिसिनमधील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुरुषांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र, महिलांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण ही सध्या चिंतेची बाब ठरत आहे.

तज्ज्ञांच्या मते फुप्फुसांमधून कर्करोग एकदा पसरला की, तो यकृतापर्यंत पोहोचून कावीळ होते आणि मूत्रपिंडाजवळील ग्रंथीमध्ये पसरून त्यांना निष्क्रिय करतो. त्यामुळे बीपी अत्यंत कमी होऊन आपत्कालीन स्थिती निर्माण होणे, वेदना आणि हाडांना फ्रॅक्चर होणे आणि कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला की, स्ट्रोक किंवा फिट येऊ शकते. येत्या काही वर्षांत भारतात तंबाखूशी संबंधित कारणांमुळे हा आजार होण्याचे प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ.एस. विश्वनाथ म्हणाले फुप्फुसाच्या कर्करोगाला सुरुवातीच्या टप्प्यात क्षयरोग समजले जाते. कारण या दोन्ही आजारांची लक्षणे बऱ्यापैकी सारखीच आहेत. सर्जिकल ऑन्कॉलॉजी डॉ.जगन्नाथ दीक्षित म्हणाले, फुप्फुसाच्या कर्करोगाचे ५० टक्के रुग्ण निदानानंतर पहिल्या वर्षभरातच दगावतात. मात्र, कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले, तर मृत्यूमध्ये १४-२० टक्के घट करू शकतो. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यातली लक्षणे फारशी दिसून येत नाहीत. ग्रामीण महिलांमध्ये रिव्हर्स स्मोकिंग हे फुप्फुसांचा कर्करोग होण्यामागील प्रमुख कारण ठरत आहे. टारगेटेड थेरपी आणि जेनेटिक टेस्टिंगमुळे रुग्णाचे वाचण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

टारगेटेड थेरपी ही अत्यंत महत्त्वाची

चीफ सायंटिस्ट आणि मोलिक्युवर ऑन्कॉलॉजीचे डॉ.सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले, कर्करोगाचे उपचार करण्यात टारगेटेड थेरपी ही एक अत्यंत महत्त्वाची पद्धत म्हणून उदयास आली आहे. केमोथेरपीमध्ये वेगाने विभाजन होणाऱ्या साधारण आणि कर्करोगाच्या अशा सर्व प्रकारच्या पेशींवर मारा केला जातो. ज्यात साधारण पेशीही मारल्या जातात, तर टारगेटेड थेरपीजमध्ये कर्करोगाशी संबंधित विशिष्ट मॉलिक्युलरला लक्ष्य केले जाते. केमोथेरपीच्या तुलनेत टारगेटेड थेरपीचे साइड इफेक्ट्स कमी असतात आणि त्यामुळे रुग्णाच्या आयुष्याचा दर्जाही सुधारतो.