Join us  

खुनी हल्ल्याप्रकरणी महिला वकिलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 3:19 AM

जमीनीच्या वादातून सुरक्षा रक्षकावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी एका महिला वकीलाला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. स्मिता देवकर असे तिचे नाव

मुंबई : जमीनीच्या वादातून सुरक्षा रक्षकावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी एका महिला वकीलाला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. स्मिता देवकर असे तिचे नाव असून यापूर्वी दोघांना अटक केली असून अन्य सात आरोपी अद्याप फरारी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.२३ फेबु्रवारीला बोरिवलीतील पोरा केंद्र येथे ही घटना घडली होती. त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीत सुरक्षारक्षक अंजाला लिंगन्ना संदराजूला (वय ४३) गंभीर जखमी झाला होता.न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याने देवकर हिला शुक्रवारी अटक करण्यात आली असून तिला सोमवारपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. गेल्या महिन्यात आकाश प्रताप जगताप व संजय मधूकर निवडकर यांना अटक करण्यात आली असून मारामारी व खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी सांगितले की, जमीनीच्या वादातून अ‍ॅड. स्मिता देवकर हिच्यासह दहा जण बोरिवली पश्चिम येथील योगेश टॉवरजवळील मैदानाच्या बाजूला असलेल्या पोरा केंद्रावर जावून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षा रक्षकाने अटकाव केला असता त्याला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करीत त्याची मोटार सायकलची मोडतोड केली होती. याप्रकरणात जगताप याला १४ मार्चला तर निवडकरला १९ एप्रिलला अटक करण्यात आली होती, अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे निरीक्षक सुधीर घोसाळकर यांनी सांगितले.