Join us  

साक्षीदारांनी संरक्षण मागितलेच नाही, सोहराबुद्दिन बनावट चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:58 AM

सोहराबुद्दिन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणाच्या खटल्यातील साक्षीदारांनी आपल्याकडे संरक्षण देण्याची मागणी केलीच नाही, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

मुंबई : सोहराबुद्दिन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणाच्या खटल्यातील साक्षीदारांनी आपल्याकडे संरक्षण देण्याची मागणी केलीच नाही, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. आतापर्यंत या खटल्यातील ४४ साक्षीदारांपैकी ३१ साक्षीदार विशेष न्यायालयाने ‘फितूर’ झाल्याचे जाहीर केले आहे.एकामागून एक साक्षीदार फितूर होण्याचे सत्र सुरूच असल्याने उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी काय पावले उचलण्यात आली आहेत? अशी विचारणा सीबीआयकडे सोमवारी केली. त्यावर मंगळवारी उत्तर देताना सीबीआयतर्फे ज्येष्ठ वकील अनिल सिंग यांनी आत्तापर्यंत साक्षीदारांनी संरक्षणच मागितले नाही, अशी माहिती न्या. रेवती मोहिते-डेरे यांना दिली.‘साक्षीदारांना समन्स बजावतानाच त्यांना संरक्षणासंबंधी माहिती दिली जाते. सीबीआयने त्यांना माहिती दिली होती. मात्र, साक्षीदारांनी संरक्षण मागितलेच नाही,’ असेही सिंग यांनी सांगितले.साक्षीदारांनाच हजर करा...मंगळवारी साक्ष नोंदविलेल्या दोन्ही साक्षीदारांनी सरकारच्या दाव्याचे समर्थन केले. यांची साक्ष नोंदविल्यावर सीबीआयने अन्य साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. मात्र, न्यायालयाने नकार दिला. संबंधित साक्षीदारांनाच न्यायालयात हजर करा. जे अधिकारी खटल्यावरील सुनावणी तहकूब करण्यास सांगत आहेत, त्यांना न्यायालयात हजर करू, अशी तंबीही न्यायालयाने सीबीआयला दिली.

टॅग्स :उच्च न्यायालय