Join us  

राजावाडी रुग्णालयाबाहेर नातेवाइकांचे आंदोलन , मदतीशिवाय मृतदेह न स्वीकारण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 5:48 AM

घाटकोपर विमान दुर्घटनेतील पादचारी गोविंद दुबे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी राजावाडी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. कोणतीही चूक नसताना गोविंद यांचा मृत्यू झाल्याचे सांगत सरकारने त्वरित मदत करावी

मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेतील पादचारी गोविंद दुबे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी राजावाडी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. कोणतीही चूक नसताना गोविंद यांचा मृत्यू झाल्याचे सांगत सरकारने त्वरित मदत करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आणि रुग्णालयाच्या आवारातच ठिय्या मांडला.जुहूवरून उड्डाण केलेले विमान अवघ्या काही मिनिटांत घाटकोपर येथील जीवदया लेन परिसरात कोसळले. या मोठ्या अपघाताने अवघ्या मुंबईकरांना धक्का बसला. घटना घडली तेव्हा गोविंद दुबे तेथूनच जात होते. ते एका साईटवर कारपेंटर म्हणून कामाला होते. दुपारी कामावरून घरी जाताना ही दुर्घटना घडली. त्यांच्या अंगावर जेट फ्युएल पडले आणि त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला.दुर्घटनेमध्ये विमानातील चौघांचा मृत्यू झाला. तर एका पादचाऱ्याचाही मृत्यू झाला असे समोर येत होते. पण मृतदेह जळाल्यामुळे त्याची ओळख पटण्यास अडचणी येत होत्या. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता. त्यानंतर घरातल्यांना या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आला. मृतदेहाच्या नाकाच्या आकारावरून गोविंद दुबे यांच्या कुटुंबीयांना त्यांंच्या मृतदेहाची ओळख पटल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दुबे कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला नव्हता.गोविंद यांचे मामा प्रदीप गुप्ता यांनी सांगितले, गोविंद यांचे कुटुंबीय गावी राहते. मुंबईत तो कळव्याला राहत होता. उदरनिर्वाहासाठी गोविंद याने काही दिवसांपूर्वी मुंबईचा रस्ता धरला होता. घरातील कर्ता पुरुष गमाविल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोविंद यांचा भाऊ गोपाळ दुबे यांनी सांगितले, विमान कंपनीकडून आणि राज्य शासनाकडून मदत हवी आहे. कोणतीही चूक नसताना आमच्या कुटुंबातील एक जीव गेलाय. असे सांगताना तो हमसून हमसून रडत होता.रुग्णालयातील जखमी विवाहित नरेशकुमार हा पत्नी पूजासह मामाच्या साईटवर कामासाठी आला होता. विमान दुर्घटनेदरम्यान पत्नीही सोबत होती. मात्र, ती तळमजल्यातील खोलीवर कामावरून परतली. मोठा आवाज आणि आगीच्या लोळांमध्ये सर्व परिसर होरपळला होता. त्यादरम्यान बहुतांश मजूर जेवणासाठी तळमजल्यावरील खोल्यांमध्ये परतल्याचे कौशलकुमार यांनी सांगितले.बहुतांश सर्व जण बिगाºयाचे काम करतात. तळघरातून वर आल्यावर आगीची झळ कौशल यांनादेखील लागली. त्यामुळे ते आगीच्या झळीपासून दूर पळाले. त्यांना प्रत्येक जण दूर पळताना दिसत होता. मात्र, नरेशकुमारची काळजी असल्याने तरीही त्याला शोधले. धुराच्या लोटांमधून नरेशकुमार दिसला. त्याचा चेहरा, हाताचे पंजे आगीने होरपळल्याचे दिसले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुपारी १चा सुमार असेल. नेहमीप्रमाणे दुकानातून जेवण्यासाठी जवळच असलेल्या घरी परतलो. तर ‘मोठ्ठा धडाम्’ असा आवाज आला. काही कळायच्या आतच परिसरात मोठी ऊब निर्माण झाल्याचे जाणवले. गॅलरीतून वाकून पाहिले तर काळजाचा ठोकाच चुकला. झाडांच्या मधून विमान जळताना दिसत होते. जीवदया लेन रोडवरील रामभवन इमारतीतील जगदीश पटेल सांगत होते.जगदीश पटेल हेदेखील या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. दुपारचे जेवण करण्यासाठी घरी परतले. जेवायला बसले असतानाच मोठ्या आवाजाने ते गॅलरीत आले आणि त्यांनी समोरचा विमान अपघात पाहिला.शनिवारी प्रसादवर शस्त्रक्रियानोकरीच्या पहिल्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणारा प्रसाद महाकाल (२५). गुरुवारी टीव्ही पाहत असताना त्याने विमान दुर्घटनेविषयीचे वृत्त पाहिले; आणि पुढचा-मागचा कसलाही विचार न करता प्रसाद घटनास्थळी धावला. मदतीदरम्यान अनेकांचे जीव त्याने वाचविले.मात्र या दरम्यान प्रसादच्या पायाला विमानाचा पंखा लागला. त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावरही राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला सध्या चालता येत नाही, त्यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई विमान दुर्घटना