दोन दिवसांत नवे सरकार की सर्व पर्याय आले संपुष्टात? लक्ष राजभवनाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 06:54 AM2019-11-08T06:54:02+5:302019-11-08T06:56:29+5:30

लक्ष राजभवनाकडे : भाजपचा सत्तेसाठी दावा नाही, शिवसेनाही बसली अडून

Within two days the new government or all the options came to an end? | दोन दिवसांत नवे सरकार की सर्व पर्याय आले संपुष्टात? लक्ष राजभवनाकडे

दोन दिवसांत नवे सरकार की सर्व पर्याय आले संपुष्टात? लक्ष राजभवनाकडे

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १४ दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्तेसाठी दावा केलेला नाही, तर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना अडून आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीही विरोधी पक्षातच बसण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यात अभूतपूर्व राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असून येत्या दोन दिवसांत नवे सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रपती राजवट अटळ दिसत आहे. गुरुवारचा दिवस निर्णायक ठरणार असे म्हटले जात असतानाच वेगाने घडलेल्या घटनांनी सत्तास्थापनेचा मार्ग अधिकच बिकट झाला. आता चेंडू राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कोर्टात असून ते कुठला निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपत असून, त्यापूर्वी नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. ते झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल करतील आणि ती प्रत्यक्षात येईल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची कल्पना दिली. मात्र सत्तास्थापनेचा दावा केला नाही. भाजपला अजूनही शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार होऊ शकते. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार होऊ शकेल किंवा भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे तीन पर्याय शिल्लक आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याची चाचपणी भाजप करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तथापि, रा. स्व. संघाने अनैसर्गिक युतीस संमती न दिल्यास भाजपपुढे शिवसेनेशिवाय पर्याय दिसत नाही. सत्तास्थापनेसाठी ९ तारखेच्या संध्याकाळपर्यंतची वेळ हाती आहे. या अवधीत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल. ही राजवट लागू असण्याच्या काळात काही समीकरणे जुळली आणि सत्तास्थापनेसाठी कोणी पुढे आले तर नवे सरकार होऊ शकेल आणि राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाईल.


मोदी, शहा यांच्या हस्तक्षेपाची शक्यता
भाजपच्या राज्यातील नेत्यांना शिवसेना दाद देत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपचे अध्यक्ष अमित शहा हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. मोदी वा शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलतील. कदाचित शहा वा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव यांचे मन वळवतील, अशी शक्यता आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी ठाम
‘आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे आणि आम्ही तो विधानसभेत सिद्ध करू, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी जाहीर केले असून, भाजपने ताठरपणाची भूमिका सोडावी; जे ठरले, त्यानुसार केल्यास युती आम्हालाही तोडायची नाही, असे सांगून उद्धव ठाकरे अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यावर ठाम असल्याचे सांगितले.

...तरच फोन करा
लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीचा फॉर्म्युला ठरवताना
जे-जे ठरलंय, त्यानुसार करायचे असेल तर फोन करा, मी चर्चेला तयार आहे. - उद्धव ठाकरे


शिवसेनेला काय मिळू शकेल?
मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद व निम्मी मंत्रिपदे याबरोबरच केंद्रात आणखी एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. तसेच राज्यात निम्मी महामंडळे दिली जाऊ शकतात. पण हे कबूल करण्यासाठी पंतप्रधान वा अमित शहा हेच शिवसेनेला हवे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Within two days the new government or all the options came to an end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.