Join us  

हिवाळ्यात हृदयविकारग्रस्तांनी घ्या विशेष काळजी; तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 1:33 AM

अनेक जण अनभिज्ञ : थंडीत हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण जास्त

मुंबई : हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाणही वाढलेले आढळून येते, याची अनेकांना माहिती नसते. थंडीच्या महिन्यांमध्ये येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण सुमारे ३१ टक्क्यांनी जास्त आहे. तापमानात घट झाल्यामुळे हिवाळ्यात रक्तवाहिन्या संकुचित होतात. परिणामी पुरेसे रक्ताभिसरण सुरू ठेवण्यासाठी हृदयावरील दाब वाढतो आणि या ताणामुळे हृदयविकाराच्या झटक्यांचा धोका वाढू शकतो. आपल्याला हृदयरोग असेल अशी कल्पनाही नसलेल्या व्यक्तींना या हंगामात हृदयविकार जडण्याची शक्यता बळावते. त्यामुळे या ऋतूत हृदयविकारांच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

हिवाळ्यात ज्या व्यक्ती शारीरिक श्रमाची कामे करतात त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता असते. जर त्यांच्या शरीराचे तापमान हिवाळ्यास अनुकूल नसेल आणि तरीही त्या व्यक्ती बाहेरच्या थंड हवामानात अनेक तास राहत असतील, तर अपघाती हायपोथर्मिया होण्याची शक्यता वाढते. शारीरिक तापमान आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीर फार काळ तग धरू शकत नाही व हे प्राणघातक ठरते. ज्यांना अनेक दिवसांपासून हृदयरोग आहे, ६० वर्षांचे वृद्ध, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, मधुमेही, उच्च कोलेस्ट्रॉल असणारे, धूम्रपान करणारे किंवा तंबाखू खाणारे, केवळ हिवाळ्यात उत्साही असणारे अशा व्यक्तींना हृदयविकाराचा धोका असतो आणि छातीत तीव्र वेदना होऊ शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

याविषयी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले की, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला असल्याची बहुतेकांना जाणीव नसते. त्यामुळे हृदयाची नियमित तपासणी करणे अतिशय गरजेचे आहे.सुदृढ कसे राहावे?या ऋतूत मद्यप्राशन टाळा. कारण अति मद्यपानामुळे हृदयाचे ठोके अनियमित होणे, धडधड वाढणे, चक्कर येणे किंवा छातीत दुखणे अशी लक्षणे दिसतात.स्वत:ला उबदार ठेवण्यासाठी गरम कपडे घाला. हिवाळ्यात अतिशारीरिक श्रम टाळा. हृदयाच्या आवश्यक त्या सर्व तपासण्या करून हृदय निरोगी असल्याची खातरजमा करून घ्या.

टॅग्स :हृदयविकाराचा झटका