Join us  

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय होणार सोमवारपर्यंत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 1:48 AM

स्थानिक पातळीवर शाळांची चाचपणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ८८ टक्के शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्याप मुंबई, ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू झाल्या नसून १५ जानेवारीपर्यंत त्या बंद राहणार आहेत. मात्र १५ जानेवारीनंतर तरी मुंबईतील शाळांची घंटा वाजणार का? याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे. पालक आणि शिक्षकही या निर्णयाची नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आतुरतेने वाट पाहत आहेत. 

दरम्यान, शाळा सुरू करण्यासाठी शाळांची चाचपणी सुरू असून सोमवारपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार की नाही याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरीही अन्य देशांत कोरोनाची आलेली दुसरी लाट व अन्य राज्यांतील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळा व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील सर्व माध्यमाच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांचे अजूनही ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र यादरम्यान दहावी-बारावीची परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी, पालकांना शाळा बंद असल्याने त्यात अडचणी येत आहेत. सोबतच शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापकही शाळांची स्वच्छता, सुरक्षेचे नियोजन या सगळ्या तयारी अद्याप करायच्या की नाही याबाबतीत संभ्रमात आहेत.  

जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना शाळा व शैक्षणिक संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतही शाळा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त  केली जात आहे.  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी धारावी मतदारसंघातील काही महानगरपालिकेच्या शाळांना भेटी दिल्या. त्यामध्ये राजश्री शाहू महाराज शाळा, ढोरवाडी स्कूल, ट्रान्सीट कॅम्प स्कूल, धारावी महापालिका उर्दू शाळा क्रमांक २ आणि कला किल्ला स्कूल या मनपा शाळांचा समावेश होता. या वेळी त्यांनी शाळेतील इमारत दुरुस्ती, क्रीडांगण दुरुस्ती, नवीन बांधकाम, भौतिक सोयी-सुविधा इत्यादींबाबतच्या सूचना महानगरपालिका व शिक्षण विभागाचे अधिकारी यांना  दिल्या आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या