Why go with the BJP that is putting Aditya in trouble?, devendra fadanvis meet sanjay raut | आदित्यला अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे कशाला?

आदित्यला अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे कशाला?

अतुल कुलकर्णी।

मुंबई : ज्या आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांनी अडचणीत आणले, त्यांच्याविषयी कारण नसताना बदनामी केली, शिवसेनेला अडचणीत आणले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका सतत केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी लावला आहे. खा. संजय राऊत यांना या सगळ्या प्रश्नांची जाणीव नाही का, अशी टीकाही शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी केली आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संबंध गुंतागुंतीचे झाले आहेत. सत्तेत राहता आले हेच खूप झाले, अशी काँग्रेसच्या नेत्यांची भावना आहे, तर अन्य दोघे पक्षवाढीसाठीच्या एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. एकनाथ खडसे आणि भाजपमधील अन्य असंतुष्ट नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असताना खा. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटीची बातमी बाहेर आली. त्यामुळे भाजप-शिवसेनेत संवाद सुरू झाला की काय, या शंकेमुळे अस्वस्थ नेते दुविधेत गेले. यात राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचेही काम सहज झाले आहे. पण एवढा मर्यादित अर्थ या भेटीचा नाही. सत्ताधारी तीनही पक्षांचे एकमेकांत अडकलेले पाय आणि त्याची गुंतागुंत टोकाची आहे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला ही महाविकास आघाडी तोडून दुसरीकडे जाणे बिलकूल सोपे राहिलेले नाही. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत.
त्यामुळे दोघे जर एकत्र आले तर ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना मान्य असेल का? आणि त्यामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व वाढले तर ते राज्यातील भाजपच्या काही नेत्यांना मान्य होईल का? त्यात पवार यांनी स्वत:ची ‘सेक्यूलर’ अशी बनवलेली प्रतिमा आणि त्यासाठीच भाजपसोबत न जाण्याचा निर्णय त्याचे काय, असे प्रश्न आहेतच. त्यातही राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट करायचे ठरवलेच तर त्याला विधानसभेच्या अध्यक्षांची मान्यता लागते, जे पद काँग्रेसकडे आहे. त्यामुळे हे म्हणावे तेवढे सोपे नाही. भाजप आणि शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येणार का? तसे असेल तर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल. त्याला शिवसेना तयार आहे का? दोघांची ‘व्होटबँक’ एकच आहे.
त्यामुळे कोणाची तरी मते कमी झाल्याशिवाय दुसºयाचा फायदा नाही. अशा स्थितीत महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीची मते शिवसेनेला कधीच मिळत नव्हती, ती जर मिळत असतील तर त्यात सेनेचा फायदा नाही का, असा सवालही सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

कोणालाही भाजपसोबत जाणे परवडणारे नाही
शिवसेनेचा पाच वर्षे सतत अपमान केला, आदित्यला अडचणीत आणले, एकनाथ शिंदे यांना कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत स्टेजवर भाजपमुळे रडावे लागले, अशा भाजपसोबत जायचे कशाला, असे प्रश्नही शिवसेना नेते करत आहेत.

राज्यात सत्ता आली नसती तर काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली असती. आज सत्तेमुळे कार्यकर्ते टिकून राहिले आहेत, राज्यात पक्ष जिवंत राहिला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी जर भाजपसोबत जात असेल तर आपणही शिवसेनेसोबत राहू, असे मत राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बोलून दाखवत आहेत.
ही सगळी परिस्थिती पाहिली तर एकमेकांच्या गुंतागुंतीमुळे कोणालाही आज तरी भाजपसोबत जाणे परवडणारे नाही ही वस्तुस्थिती आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why go with the BJP that is putting Aditya in trouble?, devendra fadanvis meet sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.