Join us  

दादरमधील कोहिनूर स्क्वेअरच्या कांट्रॅक्टरला कोणाचा आशीर्वाद? आमदार प्रसाद लाड यांचा सवाल

By मनोहर कुंभेजकर | Published: November 08, 2023 1:18 PM

सोमवारी मध्यरात्री कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंगमध्ये लागली होती आग

मनोहर कुंभेजकर, मुंबई: दादरमधील कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंग लॉट ३ मध्ये परवा रात्री अचानक आग लागली आणि काही वाहनांचे नुकसान झाले. येथील ठेकेदाराची वागणूक चांगली नाही, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पत्राद्वारे महापालिका आणि संबंधित विभागांना केली आहे. या टॉवरमध्ये अनेक ऑफिसेस असून, संबंधित ठेकेदाराच्या विरोधात वेळोवेळी तक्रार दाखल करुन देखील कुठलीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे या विषयी त्वरीत कार्यवाही करून ठेकेदारास कार्यमुक्त करा व याला जबाबदार असणार्‍यावर आवश्यक ती कारवाई करा, अशी मागणी आमदार लाड यांनी केली आहे.

“२६ तक्रारी दाखल झाल्या, मात्र त्यांच्यावर कोणीही कारवाई केली नाही. कृपया उत्तर द्या, त्याला जबाबदार कोण, मुख्य अग्निशमन अधिकारी, वॉर्ड अधिकारी, मुख्य अभियंता की कंत्राटदार? कृपया जनतेला उत्तर द्या.”, असा प्रश्न यानिमित्ताने आमदार लाड यांनी उपस्थित केला आहे.

कोहिनूर स्क्वेअरमध्ये, स्मोक डिटेक्टर सिस्टमची देखभाल नाही, असंबद्ध बहुस्तरीय कार पार्किंग क्षेत्र आहे. २ चाकी आणि ४ चाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग आहे. अग्निशमन विभागाने घालून दिलेल्या सामान्य नियमांचे पालन केले जात नाही. अनधिकृत आणि बेकायदेशीर यांत्रिक कामांसाठी केंद्र असून, जेथे लोक अनेकदा दारूच्या नशेत आणि प्रतिबंधित पदार्थांच्या प्रभावाखाली आढळतात, असे त्यांनी नमूद केले असून, अनेक गाड्या अनेक महिन्यांपासून विनापरवाना आनंदीकृत गॅरेज याठिकाणी उभ्या असल्याचे आमदार लाड यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. महापालिका आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :प्रसाद लाडमुंबई