Join us  

‘दक्षिण’ दिग्विजय कोणाचा होणार?

By संतोष आंधळे | Published: March 29, 2024 8:44 AM

या लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर गेलेले अरविंद सावंत (ठाकरे गट) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

मुंबई : दक्षिण मुंबई म्हणजे स्कायक्रॅपर म्हणवणाऱ्या उंच उंच इमारती, मलबार हिल, कुलाबा येथील उच्चभ्रू वसाहती, टुमदार बंगले एकीकडे तर बैठ्या चाळी, पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या वसाहती, गळक्या इमारती, पुनर्विकास होऊनही जुन्या खुणा मिरविणाऱ्या इमारती दुसरीकडे अशी वैविध्यता. मलबार हिल आणि कुलाबा हे दोन विधानसभा मतदारसंघ सोडले तर इतर चार ठिकाणी कष्टकरी मध्यमवर्गीयांची संख्या लक्षणीय आहे.  दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चुरस असेल ती महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात. 

या लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर गेलेले अरविंद सावंत (ठाकरे गट) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात कोणता उमेदवार महायुती देणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरीही या मतदारसंघात भाजपचे राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. श्रीमंत मतदारसंघ ओळख असली तरी या ठिकाणी मध्यमवर्गीयांच्या समस्या अधिक आहेत. या मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी वरळी, शिवडी, भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघात बेरोजगार, असंघटित कामगार, नोकरदार, गरीब आणि मध्यमवर्गीय स्तरातील लोकसंख्या अधिक आहे.

२०१९ च्या लोकसभेत त्यावेळच्या युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय झालेा होता. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना  १ लाख मताधिक्य घेऊन पराभूत केले होते. त्यावेळी सावंत यांना सर्वाधिक ९९,२६९ मते मलबार हिल मतदारसंघातून मिळाली होती. त्या खालोखाल शिवडी, वरळी कुलाबा या मतदारसंघातून चांगली मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकांच्या देवरा यांना सावंत याच्यापेक्षा भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघातून ७०-७० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती.

समुद्राच्या टोकाला असणाऱ्या या मतदारसंघाला तरुणाई त्याचा उल्लेख सोबो (साउथ बॉम्बे) म्हणून करत असते. या मतदारसंघात सर्वांत कमी मतदान होण्याचा विक्रम कुलाब्याच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ मुंबादेवीतही कमी मतदानाची नोंद होत असते. अन्य चार मतदारसंघांत मतदानाची आकडेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गेली काही वर्षे मलबार हिल मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. मंगलप्रभात लोढा यांनी एकतर्फी हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.      

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४