Join us  

मुंबई कुठवर तुंबणार, याला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 1:21 AM

मुंबईकरांचा सवाल : पावसामुळे दाणादाण रस्ते तुंबले, रेल्वे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईची पार दैना उडवली. पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक खोळंबली, तर पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची अवस्था बिकट झाली. या पावसाने या मौसमात दुसऱ्यांदा दक्षिण मुंबईला झोडपून काढले. अजून कीतीकाळ मुंबई अशी तुंबणार आहे, असा सवाल मुंबईकर करत आहेत.

पावसाने झालेल्या दुरवस्थेचे खापर विरोधकांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर फोडले. तर पालिकेने पावसाच्या प्रमाणाचा दाखला दिला. हा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला. पावसाने मुंबईची दैना केली असताना सत्ताधाºयांकडून आणि महापालिकेकडून नेहमीप्रमाणे मोठ्या पावसाचे कारण सांगितले जात आहे. मात्र, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता आहे ती ब्रिटिशकालीन आहे. त्यात वाढ झालेली नाही.

पूरस्थितीचा धोका ओळखून कंटूर मॅपिंग व्हायला हवे, तो शहराच्या विकास नियमावलीचा भाग बनायला हवा होता. पावसाच्या पाण्याचा निचरा करायचा असेल तर त्याचा ओशनोग्राफीचा अभ्यास अत्यावश्यक आहे, तो झालेला नाही. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पही आता कालबाह्य झाला आहे. आता नव्याने यासंदर्भात सर्वेक्षण करून धोरण आखण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांचे दरवाजे समुद्री सपाटीपेक्षाही खाली आहेत. यावर कधी काम करणार? अशी कामांची जंत्री आशिष शेलार यांनी वाचून दाखविली. तर संपूर्ण सप्टेंबर महिन्यात जितका पाऊस पडतो त्यापैकी ८३ टक्के पाऊस मागच्या १२ तासांत पडला. वातावरणीय बदलांमुळे असे घडत आहे. याला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन विविध प्रयत्न करीत असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

प्रत्येक दुर्घटनेनंतर नव्या योजनेचे पतंग उडविले जातात. पण, त्या पूर्ण होत नाहीत. १२ वर्षे धूळ खात पडलेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्प २६ जुलैच्या जलप्रलयानंतर बाहेर काढला गेला. त्याला १५ वर्षे उलटली तरी तोही अजून पूर्ण झालेला नाही. मग, आजच्या पावसानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलेली पूर नियंत्रक टाक्यांची योजना अंमलात यायला किती वेळा मुंबई बुडण्याची वाट पाहायची, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.