Join us  

नाट्य परिषदेचा ‘वचक’ गेला कुणीकडे? ‘आपलं पॅनल’चा सवाल, निवडणुकीची रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:27 AM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही समस्त मराठी नाट्यसृष्टीची मातृसंस्था आहे; परंतु नाट्यक्षेत्रात असलेल्या विविध प्रश्नांची तड लावण्यासाठी नाट्य परिषदेचा त्यासाठी ‘वचक’ असायला हवा. हाच आवश्यक असलेला नाट्य परिषदेचा ‘वचक’ गेला आहे तरी कुठे, असा सवाल प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’ने उपस्थित केला आहे.

- राज चिंचणकरमुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही समस्त मराठी नाट्यसृष्टीची मातृसंस्था आहे; परंतु नाट्यक्षेत्रात असलेल्या विविध प्रश्नांची तड लावण्यासाठी नाट्य परिषदेचा त्यासाठी ‘वचक’ असायला हवा. हाच आवश्यक असलेला नाट्य परिषदेचा ‘वचक’ गेला आहे तरी कुठे, असा सवाल प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’ने उपस्थित केला आहे. नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी खºया अर्थाने सुरू झाली असून, ‘आपलं पॅनल’ने याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.आज नाट्यसृष्टीतील विविध घटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाट्य निर्माते, कलावंत तसेच बॅकस्टेज कलाकार यांचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील काही नाट्यगृहांची अवस्था दयनीय झाली आहे. या सगळ्यावर मातृसंस्था म्हणून नाट्य परिषदेचा काही वचकच उरलेला नाही, असे सडेतोड भाष्य ‘आपलं पॅनेल’चे मुंबई (जिल्हा) विभागाचे उमेदवार व ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना केले आहे.याच पॅनलचे मुंबई (उपनगर) विभागाचे उमेदवार व ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या पॅनेलमधले सर्व उमेदवार हे नाट्यसृष्टीत सतत कार्यरत असणारे आहेत. नाट्य व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही समविचारी मंडळी एकत्र आलो आहोत. निवडून आलो तर आलो; नाहीतर नाही, अशी आमची सरळ भूमिका आहे.प्रसाद कांबळी, डॉ. गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी-मोने, भरत जाधव, राजन भिसे, मंगेश कदम, संतोष काणेकर, रत्नकांत जगताप, अनंत पणशीकर, सुनील देवळेकर, कौस्तुभ सावरकर हे ११ रंगकर्मी ‘आपलं पॅनल’तर्फे मुंबई (जिल्हा) विभागातून निवडणूक लढवित आहेत. तर मुंबई (उपनगर) विभागातून या पॅनलचे शरद पोंक्षे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, मधुरा वेलणकर व अशोक नारकर हे ५ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नाट्य निर्माते दिनेश पेडणेकर यांनी ‘आपलं पॅनल’ला त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे. नाट्य निर्माते प्रसाद कांबळी यांचे नेतृत्व असलेल्या ‘आपलं पॅनल’ने त्यांचा वचननामाही प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्रातील नाट्यगृहे अद्ययावत करणे, प्रत्येक जिल्ह्यात प्रेक्षक योजना राबविणे, दर तीन महिन्यांनी नाट्य परिषदेशी संबंधित घटकांच्या सदस्यांचा रंगदरबार आयोजित करणे, यशवंत नाट्य संकुलाच्या क्षमतेचा वापर १०० टक्क्यांपर्यंत नेणे, थिएटर फेस्टिवल भरविणे, यशवंत नाट्य संकुल हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनविणे आदी वचने या पॅनलने त्यांच्या वचननाम्यात दिली आहेत.आम्ही सच्चे नाटकवालेच...नाट्यसृष्टी हे सांस्कृतिक क्षेत्र आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घ्यायला गेलेलो नाही. आम्ही राजकीय मंडळी नव्हे. आम्ही प्रथम रंगकर्मी आहोत आणि सच्चे नाटकवालेच आहोत, असे आपलं पॅनलचे प्रसाद कांबळी, यांनी सांगितले़

टॅग्स :मुंबई