Who is pure Supply of contaminated and smelling water; Anguish of Mumbaiis | शुद्ध कसले? दूषित आणि वास येणाऱ्या पाण्याचा पुरवठा; मुंबईकरांची व्यथा
शुद्ध कसले? दूषित आणि वास येणाऱ्या पाण्याचा पुरवठा; मुंबईकरांची व्यथा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला दररोज ठाणे जिल्ह्यातील तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा या सात तलावांतून पाणी पुरवठा केला जातो. सात तलावांची पाण्याची एकूण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढी आहे. मुंबईची पाण्याची रोजची मागणी ४ हजार ४५० दशलक्ष लिटर आहे. प्रत्यक्षात मात्र ३ हजार ८०० दशलक्ष लिटर एवढाच पाणीपुरवठा केला जातो. परिणामी, मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध; असा अहवाल भारतीय मानक ब्युरोने २० राज्यांच्या राजधान्यांच्या सर्वेक्षणाच्या आधारे केला असला तरी मुंबईला मागणी नुसार पाणी पुरवठा करण्याबाबत मुंबई महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत असून, आजही अनेक ठिकाणी येत असलेल्या पाण्याला वास येण्यासह दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा तक्रारी मुंबईकरांनी केल्या आहेत.
प्रत्येक मुंबईकराला पाणी मिळावे यासाठी पाणी हक्क समिती कार्यरत आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, आपल्याकडे एवढी धरणे आहेत की त्यात पुष्कळ पाणी आहे. मात्र, असे असले तरी आपण पाण्याच्या स्थानिक स्रोतांकडे लक्ष दिले पाहिजे.

नव्या धरणांसाठी आग्रह धरण्याऐवजी पावसाचे पाणी साठवले पाहिजे. रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष दिले पाहिजे. पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन केले पाहिजे. पाण्याच्या स्रोतांवर अतिक्रमण होता कामा नये. ते प्रदूषित होता कामा नयेत. वॉटर आॅडिट झाले पाहिजे. वॉटर आॅडिट झाले तर पाणी नक्की कुठे जाते आहे ते कळेल. मुंबई महापालिकेचे ३० टक्के पाणी हे वाया जाते, असे म्हटले जाते.

प्रत्यक्षात तसे नाही. हे सगळे पाणी वाया जात नाही. यातील टेक्निकल लॉस्ट हा १० ते १५ टक्के आहे. यातले उरलेले १५ टक्के पाणी हे मोठ्या इंडस्ट्री, हॉस्पिटॅलिटी यांना अनधिकृतरीत्या जाते. २ ते ३ टक्के पाणी हे झोपड्यांना अनधिकृतरीत्या जाते. हे कोणीच नाकारू शकत नाही. मात्र येथे एक गोंधळ हा होतो की; सगळे खापर झोपड्यांवर फोडले जाते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही नाही. अनधिकृतरीत्या पाणी घेत असलेल्या मोठ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. महत्त्वाचे हे पुराव्यानिशी सिद्ध करता येत नाही. कारण आपल्याकडे वॉटर आॅडिट होत नाही.

ठाण्यातून पुरवठा ४०० किमीचा प्रवास
१२५ किलोमीटर अंतराहून म्हणजे ठाणे जिल्ह्यातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा केला जात असताना दररोज ४ हजार ७० दशलक्ष लिटर पाणी ४०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांतून जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत आणले जाते.
पाण्याचे शुध्दीकरण केल्यानंतर ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाणी भांडूप जलशुध्दीकरण केंद्र आणि पांजारपूर येथे साठवले जाते.
विविध ठिकाणांवरील २७ जलाशयांद्वारे पाणी मुंबईत वितरित केले जाते.

पाणी दूषित; पण उपाययोजना सुरूच
महानगरपालिकेची पाणी वितरण व्यवस्था आर्थिकदृष्ट्या खर्चिक उपक्रम असून मुंबईकरांना हजारो लिटर पाणी फक्त सव्वा चार रुपयांत मिळते. पालिका यासाठी १२ ते १५ रुपये खर्च करत असते. मुंबईकरांना जवळ-जवळ हे पाणी विनामूल्य मिळत असे म्हणायला हवे. पाणी दूषित होणे ही समस्या असली तरी उपाय सुरु असतात. नळांचे नुतनीकरण जुन्या जल वाहिन्यांची पुनर्स्थापना, अनधिकृत नळजोडण्या विरुद्ध कारवाई या उपाययोजना हाती घेण्यात येतात.
- मनिषा सोनवणे, वांद्रे (पूर्व)

पाणी खरेच शुद्ध आहे का?
शेवटच्या घटकाला मिळत असलेले पाणी खरेच शुद्ध आहे का? याची तपासणी केली पाहिजे. कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, धारावीसह कांदिवली, वांद्रे येथील झोपड्यांच्या परिसरात दूषित पाणी येते. परिणामी पहिल्या घटकांत पाण्याचे शुध्दीकरण होत असले तरी शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी शुध्द मिळावे म्हणून जलवाहिन्यांमधील गळती आणि पाण्याची चोरी रोखली पाहिजे.
- राकेश पाटील, कुर्ला

अहवाल सर्वसमावेशक नाही
आजही मालाड, अंबुजवाडी या ठिकाणी लोकांना पाणी पिण्यास मिळत नाही. जे पाणी येते ते पाणी लोक इतर वापरासाठी वापरतात पण पिण्यासाठी नाही. तेथील लोकांना पाणी अशुद्ध असल्याने विकत पाणी घेऊन प्यावे लागते. महानगरपालिकेच्या जल अभियंत्यांनी महानगरपालिकेच्या शेवटी किती शुद्धतेचे पाणी मिळते आहे हे पडताळून पाहिले पाहिजे. त्यानंतर हे रँकिंग केले पाहिजे.
- नामदेव गुलदगड, जोगेश्वरी

तत्काळ काम होते
आम्हाला मरोळमध्ये चांगला पाणीपुरवठा होतो. काही भागांत जर दूषित पाणी पुरवठा होत असल्यास लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यावर तात्काळ काम केले जाते. मरोळमध्ये घरोघरी येणारे पाणी स्वच्छ आणि शुद्ध असते. - उज्वला आवळेगावकर, मरोळ

दूषित पाणी मिळते
चेंबूर टिळकनगर परिसरात आता येणारे पाणी स्वच्छ आहे. तसेच वेळवर पाणी येते. परंतु पावसाळ्यात दूषित पाणी मिळते. परिणामी मुंबई महापालिकेवर यावर उपाय योजना केली पाहिजे.
- लक्ष्मी डेरे, चेंबूर

दावा करता येणार नाही
आपल्या डोळ्यांना दिसते त्यावरून आपण पाणी स्वच्छ असल्याचे सांगतो. पण स्वच्छतेसाठी इतरही तपासण्या झाल्यानंतर ते स्वच्छ असल्याचे समजते. त्यामुळे मुंबईत मिळणारे पाणी स्वच्छ आहे असा दावा करता येणार नाही. - विकास सोनवणे, चेंबूर

पाण्याचा पुरवठा समाधानकारक
सर्वसाधारणपणे आमच्याकडे येणारे पाणी बºयापैकी चांगल्या प्रकारचे असते. महापालिकेच्या भागात स्वच्छ व चांगल्या दर्जाचे पाणी पुरवणे हे जिकीरीचे काम आहे.
- समीर राणे, भांडूप

बहुतांश भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचे (एसआरए) प्रकल्प सुरू आहे. अशा ठिकाणच्या झोपडपट्टीमध्ये काही भागांमध्ये कधी कधी गढूळ पाणी पुरवठा होतो. खोदकामावेळी पाईपलाईन तुटते. महापालिकेच्यावतीने दुर्लक्ष करण्यात येते. यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा फुटलेल्या पाईपलाईनमधून सांडपाणीही त्यामध्ये मिसळले जाते.- दीपक घाडी, जोगेश्वरी पूर्व

पाण्याला पिवळा रंग
माहूलमध्ये येणाऱ्या पाण्यावर तेलाचा तवंग असतो. त्यामुळे येथील पाणी अशुद्ध आहे. पाणी हे रंगहिन असते. मात्र माहूलमधील पाण्याला पिवळा रंग आहे. मंत्रालय, शासकीय कार्यालयाजवळील भागात पाणी शुद्ध असेल. मात्र झोपडपट्टी, चाळ भागात पाणी अशुद्ध आहे. शुध्द पाणी पिण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र या अधिकाराची पायमल्ली केली जाते. पालिका म्हणत असेल की, पाणी शुद्ध आहे. तर त्यांनी माहूल मधील पाणी तपासावे. मुंबईमधील माहूल शुद्ध पाण्यासाठी अपवाद आहे.
- अनिता ढोले-पाटील, माहूल

पालिकेचे आभार
मुंबई महापालिका मुंबईकरांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. पालिकेचे हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. मुंबई महापालिका मुंबईकरांसाठी नेहमीच चांगले काम करत आली आहे. त्यामुळे मला पालिकेचे आभार मानावेसे वाटत आहेत. - शार्दुल म्हाडगूत, परळ

दूषित पाणी पुरवठा
मुंबईतील पाणी गळती व चोरीमुळे ४० तक्के पाणी वाया जाते. मढसह काही ठिकाणी असणारी पाणी टंचाई दूर करणे आणि दूषित पाणी पुरवठा दूर करणे, जुन्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे गरजेचे आहे. - विक्रम कपूर, मढ, मालाड पश्चिम

पाणी गढूळ येते
नागपाडा येथील परिसरात येणारे पाणी अनेकदा अस्वच्छ व गढूळ असते.नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो़ महापालिकेच्या पाण्याचा दर्जा देशात अत्यंत चांगला म्हणावा असा मला तरी वाटत नाही.
- इमामुद्दीन खान, नागपाडा

दूषित पाण्याचे प्रमाण अधिक
मुंबईतील झोपडपट्टीतल्या भागांमध्ये दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असतात. अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन गटारींमधून जात असतात. अशावेळी पाईप फुटल्यास त्यात गटारींचे दूषित पाणी जाते. आजार पसरतात. मुंबईतील डंपिंग ग्राउंडच्या ठिकाणी असलेल्या वस्त्यांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण अधिक आहे.
- सीमा कणसे, चेंबुर

पाण्याला वास येतो
सुरुवातीला अर्धा तास पाणी अशुद्ध असते. या पाण्याला वास येतो. अर्ध्यानंतर पाणी शुद्ध येते. मग, हे पाणी पिण्यासाठी भरतो. इतर घरांमध्ये काही वेळा पाणी पिवळ््या रंगाचे अशुद्ध पाणी येते. मात्र काही वेळात हे पाणी स्वच्छ होते.
- प्रणित शितोळे, कुर्ला

हा दावा चुकीचा
मुंबईतील प्रदूषणात दिवसागणिक वाढ होतेय, त्यामुळे आजारही वाढत आहेत. मुलभूत सुविधा मिळत नाहीत, त्यात पाण्याचाही समावेश आहे. बरेच मुंबईकर पाण्यापासून वंचित आहे. हा अहवाल चुकीचा असून बºयाचदा मोठ्या निवासी वसाहतींमध्ये मिळणारे पाणी गढूळ असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या अहवालाची पुनर्पडताळणी झाली पाहिजे, जेणेकरुन यामागील वास्तव सर्वांसमोर येईल.
- सरोज यादव, सायन

अहवाल पारदर्शी नाही
पाण्याविषयी आलेला अहवाल पारदर्शी नाही. देशभरात प्रमुख शहरांत असलेल्या मुलभूत सेवा-सुविधांचा आढावा घेतल्यास मुंबई अजूनही मागे आहे. त्यामुळे आजारपण, प्रदूषण, कचरा या समस्यांचा विळखा या शहराला असताना येथील पाणी शुद्ध कसे काय असू शकते? कुठल्याही सामान्य मुंबईकर शहरातील पाणी शुध्द आहे हे मानू शकत नाही. या अहवालातील पारदर्शीपणा पुन्हा एकदा तपासावी. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी.
- विजय पेडणेकर, भायखळा

Web Title: Who is pure Supply of contaminated and smelling water; Anguish of Mumbaiis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.