Join us  

चौकशी सुरू असतानाच अनंत कळसेंना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 4:33 AM

जात प्रमाणपत्राबाबत चौकशी सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना सेवानिवृत्तीला काहीच दिवस बाकी असताना मंगळवारी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.

मुंबई : जात प्रमाणपत्राबाबत चौकशी सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना सेवानिवृत्तीला काहीच दिवस बाकी असताना मंगळवारी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांच्या मंडळाने कळसे यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले. कळसे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार होते.कळसे यांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा फायदा उचलत सचिवालयात अधीक्षक पदाची नोकरी मिळविली होती. तथापि, त्यांनी आतापर्यंत जात प्रमाणपत्रच सादर केले नसल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड. अनिल चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे समजते. कळसे यांच्या मुलास विधिमंडळात नेमतानाही अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.कळसे यांनी स्वत:ही विधानमंडळाचे सहसचिव अशोक मोहिते यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याची तक्रार करीत या प्रकरणी चौकशीची विनंती करणारे पत्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.त्यावर, चौकशीची सूचना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना केली होती. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे अध्यक्ष कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.मोहिते यांनी कळसेंच्या जात प्रमाणपत्राविषयी शंका उपस्थित करीत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असे त्यांचे म्हणणे होते.कळसे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता जात प्रमाणपत्राबाबतचे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा त्यांनी केला.