Join us  

मुंबईत मराठी माणूस शिल्लक ठेवला कुठे? राणेंची सेनेवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:56 AM

मराठी माणसाचे नाव घेत राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मुंबईत मराठी माणूस शिल्लक ठेवलाय कुठे? तो मुंबईबाहेर जाताना शिवसेना गप्प का बसली, अशी सडकून टीका स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी गुरूवारी केली.

मुंबई : मराठी माणसाचे नाव घेत राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मुंबईत मराठी माणूस शिल्लक ठेवलाय कुठे? तो मुंबईबाहेर जाताना शिवसेना गप्प का बसली, अशी सडकून टीका स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी गुरूवारी केली.रंगशारदामध्ये आयोजित स्वाभिमानच्या मेळाव्यात ते बोलत होते. सत्ता सोडण्याची धमकी देणारी शिवसेना अजून सत्तेत तंगडे अडकवून का बसली आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. मुंबई महापालिका क्षेत्रातील समस्यांवर यापुढे स्वाभिमानकडून प्रखर आंदोलन केले जाईल, असा इशारा देत आपले यापुढील लक्ष्य शिवसेनाच असेल हेही त्यांनी स्पष्ट केले. मला उगीच डिवचू नका. जोवर बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत मी एकही शब्द बोललो नाही. पण आता मला उगीच डिवचत राहिलात, तर तुमच्या सर्व गोष्टी बाहेर काढेन, असा इशाराही त्यांनी सेना नेतृत्त्वाला दिला.यावेळी राणे यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केले. काँग्रेस नेत्यांच्या आग्रहावरून मी त्या पक्षात गेलो. सहा महिन्यांत मुख्यमंत्री करू, असे आश्वासन मला काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्याकडून त्यावेळी देण्यात आले होते. मात्र माझी महसूल मंत्रीपदावर बोळवण करण्यात आली. सर्व काँग्रेस आमदारांची मला पसंती असूनही अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यात आले. ज्यांना महाराष्ट्र समजतही नाही, त्यांना दिल्लीवरून मुख्यमंत्रीपदी आणण्यात आले, अशी टीकाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली. त्यामुळेच राज्यातील सत्ता काँग्रेसने घालवली आणि मी वेगळा पक्ष काढण्याचे ठरवले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.महागाईवर चर्चा झाली का?भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यात बुधवारी दोन तास झालेल्या बंदद्वार भेटीबद्दलही राणेंनी तिरकस टीका केली. भाजपाला इशारे देणाºयांनी बंद दाराआड दोन तास चर्चा केली. ती काय देशातली महागाई कमी करण्यासंदर्भात होती का, असा खोचक सवालही राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विचारला.

टॅग्स :नारायण राणे