Join us

अतिगर्दी, प्रवाशांचे मृत्यू टाळण्यास तुम्ही काय केले?

By admin | Updated: December 3, 2015 03:59 IST

अतिगर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्या रोज वाढतच असताना गेल्या पाच वर्षांत प्रवाशांचा मृत्यू व अतिगर्दी टाळण्यास काय उपाययोजना आखल्यात, असा सवाल करत

- हायकोर्टाचा रेल्वे प्रशासनाला सवाल

मुंबई : अतिगर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्या रोज वाढतच असताना गेल्या पाच वर्षांत प्रवाशांचा मृत्यू व अतिगर्दी टाळण्यास काय उपाययोजना आखल्यात, असा सवाल करत उच्च न्यायालयाने बुधवारी रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले, तसेच १६ डिसेंबर रोजी याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही रेल्वेला दिले. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांवर न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. बुधवारच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी २७ नोव्हेंबरला २१ वर्षीय भावेश नकाते याचा लोकल प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘तुम्ही (रेल्वे) काही केले, तर अशाच प्रकारे प्रवाशांचा मृत्यू होत राहणार. कोणीही ही बाब गांभीर्याने घेत नाहीये. रेल्वेसाठी हा आणखी एक मृत्यू आहे. ही अत्यंत दुख:द बाब आहे. रेल्वे याबाबत असहाय्य आहे, असे दिसते,’ अशा शब्दांत खंडपीठाने रेल्वेला धारेवर धरले. आणखी दोन बळीडोंबिवली : मंगळवारी रात्री नितीन चव्हाण या ४५ वर्षीय प्रवाशाचा डोंबिवलीनजीक लोकलमधून पडून मृत्यू झाला, तर बुधवारी सकाळी ९.३०च्या सुमारास अन्य एकाचा रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या लोकलचा अंदाज न आल्याने अपघात होऊन मृत्यू झाला. त्याची ओळख पटली नाही. नितीन चव्हाण हे सखारामनगर, कोपर क्रॉस रोड, डोंबिवली येथील रहिवासी होते. ते चर्चगेट येथे एका सिक्युरिटी कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बदलापूर स्टेशनजवळ गाडी पकडताना तोल गेल्याने, इमरान शेख (२४) हा युवक जखमी झाला.