Join us

वेस्टर्न आणखी फास्ट होणार, १३ लाख प्रवाशांना मिळणार सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मे किंवा जून महिन्यांत प्रवाशांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मे किंवा जून महिन्यांत प्रवाशांना घेऊन धावणार असून, या दोन्ही मेट्रोंमुळे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम उपनगरांत या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर उपनगरीय रेल्वेसेवेसोबत इतर वाहतुकीवर येणारा ताण कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात असून, पश्चिम उपनगरांतील वाहतुकीचा वेग आणखी वाढणार आहे.

दहिसर पूर्व ते डी.एन.नगरला जोडणाऱ्या १८.५ किमी लांबीच्या मेट्रोच्या बांधकामासाठी ६ हजार ४१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात आनंदनगर, ऋषीसंकुल, आयसी कॉलनी, एक्सर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीरनगर, कामराजनगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूरनगर, गोरेगाव मेट्रो, आदर्शनगर, शास्त्रीनगर आणि डीएननगर अशी १६ स्थानके असतील.

अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडणारी १६ किमी लांबीची मेट्रो ६ हजार २०८ कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे. यामध्ये दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व) अशी १३ स्थानके असतील.

* मार्चपासून चाचणी सुरू

मुंबई मेट्रो २ अ (दहिसर पूर्व ते डीएननगर) आणि ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) साठी वापरण्यात येणारा भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो कोच मुंबईत दाखल झाला. त्याचे अनावरणही झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच एकात्मिक कृतींसाठी चारकोप आगार विकसित करण्यात आले आहे. मेट्रो चाचणी मार्चपासून सुरू होईल. ती पुढे महिनाभर सुरू राहील. त्यानंतर मे महिन्यापासून मेट्रो धावू लागेल.

--------------------