Join us  

प्रवासी सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने घेतला स्टिकरचा आधार, मात्र मराठीची केली 'एैशी की तैशी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 9:58 PM

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. याच धर्तीवर पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या पाय-यांवर विविध स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. मात्र स्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मराठीची एैशी तैशी’ झाल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देप्रवासी सुरक्षिततेसाठी घेतला स्टिकरचा आधारस्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मराठीची एैशी तैशी’ ‘कृपया लहान चेंडू घेऊ नका’

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. याच धर्तीवर पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या पाय-यांवर विविध स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. मात्र, स्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मराठीची एैशी तैशी’ झाल्याचे दिसून येत आहे. 

पश्चिम रेल्वेच्या  गोरेगाव आणि सांताक्रुझ स्थानकातील पादचारी पूलांच्या पाय-यांवर ‘कृपया लहान चेंडू घेऊ नका’, ‘कृपया एकतर बाजूला ठेवा’, ‘कृपया हँड्राईल धरुन ठेवा’,  ‘कृपया एक पाऊल वगळू नका’ असा संदेश देणारे स्टिकर लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवासी जागरुकतेसाठी चिटकवण्यात आलेले स्टिकर सध्या प्रवासी हास्याचे विषय बनले आहेत. विशेष म्हणजे, इंग्रजी संदेशाचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा वापर करण्यात आल्याने हा घोळ झाल्याचे समजते.

 एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर बांधकामाधीन आणि सुस्थितीत असलेल्या पादचारी पूलांच्या पाय-यांवर स्टिकर चिटकवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत संदेश देणारे स्टिकर चिटकवण्यात आले आहेत.  यामध्ये  ‘कृपया रांगेत चालावे’, ‘ढकला ढकल करु नये’, ‘स्वच्छता ईश्वर का घर है,’ अशा आशयांचे स्टिकर लावण्यात आले आहेत. एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली त्या दादर दिशेकडील पाय-यांवर अशा प्रकारचे स्टिकर लावण्यात आलेले नाही. या पाय-यांच्या विरुद्ध दिशेला उतरणा-या पाय-यांवर स्टिकर चिटकण्यात आले आहेत. तसेच परळ-एल्फिन्स्टन स्थानकांना जोडणा-या पूलावरील एल्फिन्स्टन स्थानकाच्या फलाटांना जोडणा-या पाय-यांवर असे स्टिकर चिटकवले आहेत. मात्र दुर्घटना घडलेल्या पाय-यांवर स्टिकर चिटकवण्यात न आल्याने प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :मुंबई लोकलएलफिन्स्टन चेंगराचेंगरी