Join us  

टिळक नगर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसर समस्यांनी ग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 1:17 AM

चालकांना नाहक त्रास; अस्वच्छता, दुर्गंधी व खड्ड्यांचा त्रास

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील टिळक नगर स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसराला अनेक समस्यांनी वेढले आहे. स्थानकात प्रवेश करताना योग्य पायवाट नसल्याने प्रवाशांना चिखलातून अथवा तुटलेल्या लाद्यांवरून स्थानकात प्रवेश करावा लागतो. स्थानकात प्रवेश करण्याच्या वाटेत पाऊस पडल्यावर पाणी साठत असल्याने नागरिकांना साठलेल्या पाण्यातून चालत जाऊन स्टेशन गाठावे लागते. या वाटेत तात्पुरता उपाय म्हणून प्रवाशांनीच पेव्हरब्लॉक टाकून ठेवले आहेत. स्टेशनला लागूनच मोठ्या प्रमाणात कचरा साठला असल्याने या परिसरात प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.स्थानकाबाहेरील रस्त्यावरील पेव्हरब्लॉक उखडल्यामुळे रिक्षाचालक व दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच टिळक नगर स्थानकावरून लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने जाताना प्रवाशांना दुर्गंधी व नादुरुस्त रस्त्यांचा सामना करावा लागतो.लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने जाताना चेंबूर-सांताक्रुझ लिंक रोडच्या उड्डाणपुलाखालून जावे लागते. या उड्डाणपुलाखाली बेघर लोकांचे व गर्दुल्ल्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही जण येथे लघुशंकाही करतात. यामुळे प्रवाशांना येथून ये-जा करताना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. येथे गर्दुल्ल्यांचा सतत वावर असल्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवाशांना ये-जा करणे कठीण होऊन बसते. टर्मिनसच्या बाहेरील रस्त्यावर खड्डे व चिखल असल्यामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करीत टर्मिनसच्या आत प्रवेश करावा लागतो.लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये दररोज अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येतात. त्यामुळे येथे प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. रेल्वेमधून प्रवास करून आल्यानंतर टर्मिनसच्या बाहेर प्रवाशांना या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन या स्थानकांबाहेरील परिसर स्वच्छ, दुर्गंधीमुक्त व खड्डेमुक्त करावा, अशी मागणी प्रवासी व वाहनचालक करीत आहेत. तसेच उड्डाणपुलाखालील परिसर बेघर लोकांपासून मुक्त करण्यात यावा, अशीही मागणी जोर धरत आहे.