कोल्हापूर : टोल रद्दच्या निर्णयासाठी उद्या, मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत कोल्हापुरातील सर्व व्यवहार बंद ठेवूनच करण्याचा निर्णय सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे. सकाळी नऊ वाजता मिरजकर तिकटी चौकात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा दौरा आणि ‘कोल्हापूर बंद’ची हाक, या पार्श्वभूमीवर शहरात ७०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. कृती समितीने दिलेल्या बंदच्या हाकेला शिवसेना, भाजपनेही पाठिंबा दिला आहे. अॅटो रिक्षाचालक, मालक संघटनांसह विविध व्यापारी संघटना, किरकोळ विक्रेते सहभागी होणार आहेत. चित्रपटगृहांचा एक खेळ बंद ठेवण्यात येणार आहे. अॅटो रिक्षा बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांवर होण्याची शक्यता आहे. कोणत्याही शाळेने उद्या सुटी दिली नसली तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावणार आहे. अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. --सराफ बाजारपेठ बंद राहणार कोल्हापूर बंदला सराफ व्यापारी संघातर्फे पाठिंबा देण्यासाठी उद्या, मंगळवारी सराफ बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रणजित परमार यांनी दिली. --हुपरी चांदी कारखानदारांचा पाठिंबाहुपरी येथील चांदी कारखानदार (उद्योजक) असोसिएशनची बैठक होऊन त्यामध्ये उद्याच्या बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. उद्या हुपरीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. --उद्योजकही होणार सहभागीबंदमध्ये कोल्हापूर शहर व परिसरातील उद्योजक सहभागी होणार आहेत. त्यांनी तशा पाठिंब्याचे पत्र कृती समितीला दिले आहे. शहरातील किराणा दुकानदार मालक असोसिएशन यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.--खासगी बस संघटनेचा बंद‘कोल्हापूर बंद’मध्ये खासगी बस वाहतूकदार संघटना सर्व व्यवहार बंद ठेवून सहभागी होणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. --व्यापारी व उद्योजक महासंघ...कोल्हापूर टोल व एलबीटीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी निष्क्रिय भूमिका घेतल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांनी बंदला पाठिंबा दर्शविला असल्याचे पत्रक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.--मनसे वाहतूक सेनेचा पाठिंबा...‘कोल्हापूर बंद’ला पाठिंबा असल्याचे पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
कडकडीत बंद ठेवूनच होणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत
By admin | Updated: August 25, 2014 23:54 IST