Join us  

बोरीवलीतील प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेवर विवाह सोहळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:49 AM

चार वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात क्रीडा संकुलासाठी मंजूर झालेल्या जागेचा वापर लग्नसमारंभासारख्या व्यावसायिक कारणांसाठी होत असून हा प्रकार रोखून प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई : चार वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात क्रीडा संकुलासाठी मंजूर झालेल्या जागेचा वापर लग्नसमारंभासारख्या व्यावसायिक कारणांसाठी होत असून हा प्रकार रोखून प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.काँग्रेसचे सरकार असताना २0१२मध्ये आम्ही कोकण विभागीय क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा केला. बोरीवली (पश्चिम) येथील चिकूवाडीतील १३ एकरचा भूखंड म्हाडाकडून क्रीडा विभागाला हस्तांतरण करण्यात आला. २0१३मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी या क्रीडा संकुलाला मंजुरीही दिली. क्रीडा संकुलाला ‘सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल’ नाव देण्याची शिफारस केली होती. या जागेवर अनधिकृत कब्जा होऊ नये यासाठी पद्माकर वळवी यांना विनंती करून संरक्षण भिंत उभारून घेतली. या संबंधित सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.या जागेवर ४00 मीटर जॉगर्स पार्क, पॅव्हेलियन, प्रशस्त प्रेक्षागृह, मुलामुलींसाठी गेस्ट हाउस, हॉकी मैदान, क्रिकेट मैदान, फुटबॉल मैदान, लॉन टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर अशा अनेक सुविधा असलेला प्लॅन मंजूर करून घेतला. त्यासाठी नागपूरचे वास्तुविशारद भूषण कोतवाल यांची नियुक्तीही करण्यात आली. त्यांनी अपेक्षित खर्च आणि संपूर्ण आराखडा तयार केला होता. या प्रकल्पाला अंदाजे दीडशे कोटींच्या वर खर्च येणार असल्याने हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तसेच निविदा मंजुरीकरिता प्रस्तावितसुद्धा केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, क्रीडामंत्री पद्माकर वळवी व माजी खासदार संजय निरुपम यांनी हा प्रकल्प मार्गी लावला होता. परंतु भूमिपूजन करण्याआधीच निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाल्याने भूमिपूजन सोहळा होऊ शकला नाही; आणि त्यानंतर सरकार बदलल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सध्याचे बोरीवलीचे आमदार विनोद तावडे हे क्रीडामंत्री आहेत. मात्र तरीही या क्रीडा संकुलाची प्रगती होऊ शकली नाही. आता याच भूखंडावर नवरात्री व लग्नसोहळे होत आहेत, हे बोरीवलीकरांचे दुर्भाग्य आहे. या भूखंडाच्या व्यावसायिक वापरासाठी शासन निर्णय झाला आहे का ? बोरीवलीकर हे क्रीडा संकुल कधी उभे राहणार याबाबत प्रश्न विचारत आहेत. हे कोकण विभागीय क्रीडा संकुल उभे राहिले तर मुंबई उपनगरातून अनेक उत्तम अष्टपैलू खेळाडू तयार होतील, असे कोंडविलकर यांनी सांगितले.या क्रीडा संकुलाबाबत तत्काळ अहवाल मागवून घेतला जाईल; आणि वस्तुस्थितीची माहिती घेऊन प्रकल्प मार्गी लावण्यात येईल.- विनोद तावडे, क्रीडामंत्री

टॅग्स :मुंबई