Join us  

आम्ही पैसे देणार नाही; विद्यार्थ्यांचा पवित्रा, शिष्यवृत्तीचे पैसे खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 4:57 AM

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची सर्व रक्कम आधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकून त्यातील शिक्षण संस्थांची रक्कम त्या विद्यार्थ्याने संस्थेच्या खात्यात टाकावी या आदेशामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.

यदु जोशी मुंबई : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची सर्व रक्कम आधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकून त्यातील शिक्षण संस्थांची रक्कम त्या विद्यार्थ्याने संस्थेच्या खात्यात टाकावी या आदेशामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. त्यातच ‘आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही’ अशी पत्रे विद्यार्थी या संस्थाचालकांना देत असल्याने संस्थाचालकांची अक्षरश: झोप उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील एका नामवंत शिक्षण संस्थेला पाच पालकांनी अशी पत्रे दिली आहेत. औरंगाबाद, अहमदनगर, अकोला येथेदेखील असेच प्रकार घडत आहेत. त्यातील काही पत्रे लोकमतकडे आहेत. शिष्यवृत्तीपैकी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क हे शिक्षण संस्थांना मिळत असते तर निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना मिळतो. आतापर्यंत निर्वाह भत्त्याची रक्कमच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातजमा व्हायची आणि अन्य रक्कम शिक्षण संस्थांच्या बँक खात्यात जायची. देवेंद्र फडणवीस सरकारने यंदापासून सर्वच्या सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदा पैसा आला की मग विद्यार्थ्यांनी त्यातील शिक्षण संस्थांचा हिस्सा संस्थांच्या बँक खात्यात टाकावा, असा आदेश काढण्यात आला आहे.जे विद्यार्थी आदेशानुसार शिक्षण संस्थांचा पैसा भरणार नाहीत ते विद्यार्थी भारतीय दंडविधानानुसार शिक्षेस पात्र ठरतील, असे हमीपत्र या विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे. तथापि, अशाप्रकारे घेण्यात येणाऱ्या हमीपत्रांना न जुमानता आता शिक्षण संस्थांचे पैसे न भरण्याची भूमिका विद्यार्थी घेऊ लागल्याने संस्थाचालकांची पाचावर धारण बसली आहे.>झीरो बॅलन्स खात्याच्या मर्यादेमुळे अडचणी वाढल्या९० टक्के शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची झीरो बॅलन्स बँक खाती आहेत. या खात्यात एकावेळी २० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येतनाही वा काढता येत नाहीत, अशी मर्यादा घालण्यात आली आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीची रक्कम ही ७०-८० हजार रुपये वात्यापेक्षाही जास्त आहे. अशी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात कशी जमा करायची आणि त्यांनी ती काढायची तरी कशी असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.संस्थाचालकांनी घेतले विद्यार्थ्यांकडून चेक विद्यार्थी उद्या पैसे देतील की नाही या शंकेने ग्रासलेल्या अनेक शिक्षण संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांकडून केवळ सही केलेले चेक घेणे सुरू केले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना जबरदस्ती करण्यात येत आहे.