Join us  

आई-बापाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही सुखावतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 1:12 AM

मुंबई पोलीस दलाच्या मिसिंग पथकातील लेडी सिंघमच्या भावना

मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘मॅडम माझं बाळ हरवलंय हो.. कुठेच सापडत नाही..’ म्हणत तिने पोलीस ठाण्यातच हंबरडा फोडला. बाळ कुठे असेल, कसे असेल, त्याचे काय झाले असेल.. अशा नानाविध विचारांनी कासावीस झालेली आई आपल्यासमोर बसलेली. हाती कुठलाही पुरावा नाही.. बाळाचा शोध घेण्याचे एक मोठे आव्हान समोर असताना, तिने मात्र धाडसाने अवघ्या ४८ तासांत बाळाचा शोध घेत त्याला सुखरूप आईच्या कुशीत दिले. आपल्या काळजाचा तुकडा पुन्हा जवळ आल्याने आईचे आनंदाश्रू अनावर झाले. ते पाहून पोलीसही भारावले. आम्ही फक्त त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा आणण्यासाठी धडपडत असतो, असे पोलीस उपनिरीक्षक उषा खोसे सांगतात. खोसे यांच्याप्रमाणे मुंबई पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मिसिंग पथक मोलाची कामगिरी बजाविताना दिसत आहे. अशाच काही पडद्याआड उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पथकातील लेडी सिंघमचा घेतलेला हा आढावा...१० वर्षांमध्ये १०० मुलांचा शोध घेतला   - वैष्णवी कोळंबकर, महिला पोलीस हवालदार नाते आणखी घट्ट होतेकधी आईबाबा ओरडले म्हणून घर सोडलेले तर कधी प्रेम प्रकरणामुळे पळून गेलेल्या अल्पवयीन मुलामुलींच्या शोधापर्यंतच मर्यादित न राहता त्यांना योग्य समुपदेशन करून कुटुंबाचे महत्त्व पटवून देतात. त्यामुळे त्यांच्यातील नाते आणखीन घट्ट होत आहे.वयाच्या २७व्या वर्षी तपासाची ‘सेन्चुरी’- उषा खोसे, पोलीस उपनिरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे

सातारच्या रहिवासी असलेल्या उषा या आई, बाबा आणि भावासोबत मुंबईत राहतात. ‘नोकरी अशी असावी की, आपल्याला पाहताच लोकांच्या मनात आदर निर्माण होऊन त्यांनी सॅलूट ठोकायला पाहिजे. लहानपणी बाबांंनी सांगितलेले शब्द कानावर पडले आणि तेव्हापासूनच पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून पुढचा प्रवास सुरू झाला. वयाच्या २२व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षा उत्तीर्ण होऊन १५ जून २०१६मध्ये खोसे या राज्य पोलीस दलात भरती झाल्या. बोरीवली पोलीस ठाण्यातील पहिल्या पोस्टिंगनंतर ऑक्टोबर २०१९मध्ये त्यांची मालवणी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. तेथे मिसिंग पथकाची जबाबदारी मिळाली. नुकतेच अपहरण झालेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला पुन्हा आईच्या कुशीत देण्यात त्यांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी कुटुंबापासून दुरावलेल्या ९० पैकी ८७ अल्पवयीन मुलांची कुटुंबीयासोबत भेट घडवून दिली. तर या वर्षी पहिल्या दोन महिन्यात दाखल झालेल्या १५ गुन्ह्यांपैकी १३ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात त्यांना यश आले आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेशमधून त्यांनी या मुलांची सुटका केली आहे.भांडूप परिसरात पती, मुलासोबत राहणाऱ्या महिला पोलीस हवालदार वैष्णवी कोळंबकर या पार्क साइट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झालेल्या कोळंबकर या २०११ पासून मिसिंग पथकात काम करत आहेत. त्यांच्या या १० वर्षाच्या सेवेत ५००हून अधिक मिसिंगची प्रकरणे त्यांनी हाताळली. यात, आतापर्यंत १००हून अधिक अल्पवयीन मुलांचा शोध त्यांनी घेतला. कोळंबकर सांगतात, पोलीस दलात काम करताना निवृत्त पोलीस अधिकारी श्रीरंग नाडगौडा हे पहिले गुरु ठरले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुबेदा शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आत्माजी सावंत यांच्या तपास कसा करावा... याबाबतच्या मार्गदर्शनामुळे काम अधिक सोपे होत गेले.  पतीही पोलीस दलात असल्यामुळे त्यांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे ठरत असल्याचे त्या आवर्जून सांगतात. लिंबाचं झाड व टाकीवरून घेतला मुलीचा शोध- संजना परब, पोलीस नाईक, वाकोला पोलीस स्टेशन

वरिष्ठांचे प्रोत्साहनयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास आणखीन आवड निर्माण होते. हरवलेली व्यक्ती आपल्याच घरातील एक असल्याचे समजून शोध सुरू असतो.‘’मला वाचवा म्हणत आलेल्या कॉलमधील मुलीने समोर लिंबाच झाड आणि टाकी असल्याचे सांगून फोन ठेवला. याच तुटपुंज्या माहितीवरून वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संजना परब यांनी १६ वर्षांच्या मुलीची सुखरूप सुटका केली. लग्नाचे आमिष दाखवून या मुलीची विक्री करण्यात आली होती. वाकोला परिसरात पती आणि दोन मुलांसोबत राहणाऱ्या परब या १९९८ मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या. कस्तुरबा पोलीस ठाण्यात पहिली पोस्टिंग. गेल्या ४ वर्षांपासून वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १ जून २०१९ पासून मिसिंग पथकाची जबाबदारी खांद्यावर पडली. या दोन वर्षांत त्यांनी २०० अल्पवयीन मुला, मुलींचा शोध घेतला.  गोरखपूरमधून तीन मुलींचा शोध घेतला आहे. फेब्रुवारी २०२० ते फेबुवारी २०२१ पर्यंत  महिला (७९), पुरुष, (९५), मुली (२५), मुले (५)  यांचा शोध घेतला आहे.