On the way to Koronamukti of Dahisar ward number one | दहिसरच्या प्रभाग क्रमांक एकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

दहिसरच्या प्रभाग क्रमांक एकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : एप्रिल, मे व जून महिन्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या आर उत्तर वॉर्डमध्ये सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आशादयक चित्र आहे.

आतापर्यंत आर उत्तर मध्ये 2809 कोरोना रुग्ण असून त्यापैकी 2005 रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर 214 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एकूण 590 सक्रीय कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आर उत्तर वॉर्ड मध्ये काल एकूण 17 कोरोना रुग्ण आढळून आले आणि विशेष म्हणजे दहिसरच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये काल एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही अशी माहिती प्रभाग क्रमांक 1 च्या शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी लोकमतला दिली.

म्हाडाचे सभापती व शिवसेना उपनेते डॉ.विनोद घोसाळकर व मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 5 महिने प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध प्रभावी उपाय योजनांची अंमलबजावणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये चेस द व्हायरस ही मोहिम प्रभावीपणे रावबवून कोरोना रुग्ण युद्धपातळीवर शोधून काढले आणि त्यांच्यावर वेळीच उपचार केले.

धारावीनंतर मोठी झोपडपट्टी असलेली गणपत पाटील नगर झोपडपट्टी या प्रभागात मोडते. येथील नागरिकांच्या घरोघरी जाऊन थर्मल गन व प्लस ऑक्सि मीटरने तपासणी केली.कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यावर त्यांना इस्पितळात ऍडमिट करून त्यांच्यावर वेळीच उपचार केल्याने ते कोरोनामुक्त झाले, तर संशयित रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर कांदरपाडा येथील आद्यवत कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले असल्याने दहिसर व बोरिवली येथील गरजू नागरिकांची मोठी सोय झाली आहे अशी माहिती अभिषेक घोसाळकर यांनी दिली.

येथील इमारती आणि झोपडपट्टीची स्वच्छतेवर भर देण्यात आला. तर झोपडपट्यांमधील शौचालयांची रोज नियमित 2 ते 3 वेळा स्वच्छता करण्यात आली.

एकंदरीत येथील नागरिकांचे मिळालेले मोठे सहकार्य,शिवसैनिकांनी कोरोना योद्धा म्हणून गेली 5 महिने घेतलेली अविरत मेहनत, सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर तसेच पालिकेचे अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी यांचे मिळालेले मोठे सहकार्य यामुळे येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये काल एकही कोरोना रुग्ण मिळालेला नाही आणि गणपती उत्सव जवळ आला असतांना या प्रभागाची आता कोरोना मुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे अभिषेक घोसाळकर यांनी अभिमानाने सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: On the way to Koronamukti of Dahisar ward number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.