मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी वॉटर टॅक्सी सुविधा, रो पॅक्स सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 01:29 AM2020-01-02T01:29:32+5:302020-01-02T06:54:20+5:30

चाचण्या सुरू; मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट

Water Taxi Facility, Row Pax Service to Navi Mumbai from Mumbai | मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी वॉटर टॅक्सी सुविधा, रो पॅक्स सेवा

मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी वॉटर टॅक्सी सुविधा, रो पॅक्स सेवा

googlenewsNext

- खलील गिरकर 

मुंबई : वाहतूक कोंडीत नेहमी गुदमरणाऱ्या मुंबईकरांना दक्षिण मुंबईतील भाऊचा धक्का ते नवी मुंबई जाण्यासाठी वॉटर टॅक्सी सुविधा मिळणार आहे. नवीन वर्षात ही सेवा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल, सध्या वॉटर टॅक्सी सेवेची चाचणी सुरू असून ही सेवा जुलै महिन्यापूर्वी मुंबईकरांना मिळेल तर रो पॅक्स सेवा फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल.

हॉवरक्राफ्ट वॉटर टॅक्सी सेवा सुरुवातीला भाऊचा धक्का येथून बेलापूर दरम्यान सुरू करण्यात येईल व टप्प्याटप्प्याने त्या सेवेचा विस्तार करण्यात येईल. पुढील टप्प्यात नेरूळ, वाशी, मांडवा, ऐरोली, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कान्होजी आंग्रे बेट या ठिकाणी जाण्यासाठी ही सुविधा पुरवण्यात येईल, प्रवाशांना ही सेवा अत्यंत लाभदायक ठरेल. त्यामुळे या ठिकाणी जाऊ इच्छिणाºया मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल व जलमार्गाने प्रवास करण्याचा आनंद लुटता येईल. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध राहील.

रो पॅक्स सेवेद्वारे जहाजामध्ये वाहने घालून ती वाहने मुंबई ते मांडवा दरम्यान ने-आण करता येणे शक्य होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. या जहाजाद्वारे एका वेळी १२० चारचाकी वाहने व १८ बस किंवा ट्रकची वाहतूक या मार्गावर करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी जहाज थांबवण्यासाठी १०० मीटर बर्थिंग विभाग वापरला जाणार आहे.

२५ मिनिटांत पूर्ण होणार प्रवास
मुंबईकरांची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व जलपर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये सेवा पुरवण्यासाठी ६ टॅक्सी ऑपरेटरना मंजुरी मिळाली आहे. त्यांनी वॉटर टॅक्सी आणल्यानंतर आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येईल. मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व सिडको यांच्यातर्फे याचे काम करण्यात येत आहे. सध्या हॉवरक्राफ्ट वॉटर टॅक्सी मार्गाची चाचणी सुरू असून ही सेवा सुरू झाल्यानंतर २० ते २५ मिनिटांत नवी मुंबई गाठणे शक्य होईल. त्यामुळे मुंबईकरांचा याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. प्रत्येक हॉवरक्राफ्ट वॉटर टॅक्सीची क्षमता १० ते २५ प्रवासी दरम्यान असेल. ही सेवा जुलैपूर्वी सुरू होईल. मुंबईतून जलमार्गाने आपल्या वाहनांसह अलिबाग जाण्यासाठी रो पॅक्स सेवा फेब्रुवारीपासून सुरू होईल. यासाठी आवश्यक असलेल्या रो पॅक्स टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे.
- संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट

Web Title: Water Taxi Facility, Row Pax Service to Navi Mumbai from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.