नेरळ : कर्जत तालुक्यातील ओलमण गावामध्ये तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र तेथील नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्यास स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत अनुकूल नसल्याने दहा वर्षात पाणीटंचाई कायम आहे. परिणामी दरवर्षी टँकरचे पाणी द्यावे लागत असल्याने त्याचे आॅडिट करण्याचे कर्जतचे तहसीलदार यांनी ठरविले आहे. ग्रामस्थांना नळपाणी योजना दुरुस्त करण्यापेक्षा टँकरच्या पाण्याची तात्पुरती सुविधा करून हवी आहे असा अहवाल तहसीलदार रायगड जिल्हाधिकारी यांना पाठविणार आहेत. ७० घरांची वस्ती असलेल्या कर्जत-मुरबाड रस्त्याजवळ ओलमण गावामधील आदिवासी ग्रामस्थांना सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तेथे शासनाने पूर्वी नळपाणी योजना राबविली होती. त्यात तीन कि.मी. अंतरावरून पाणी आणून ते गावात असलेल्या साठवण टाकीमध्ये टाकून तेथे लावलेल्या नळाद्वारे पाणी दिले जायचे. मात्र त्या साठवण टाकीची दुरु स्ती जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, ग्रामपंचायत यांनी एकदाही केली नाही, परिणामी टाकीमध्ये पाणी साठून राहत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. दुसरीकडे गावामध्ये दोन विहिरी असून त्यातील एक विहीर पूर्णपणे कोरडी आहे, तर दुसरी विहीर गावाच्या खालच्या बाजूस असून त्या विहिरीत कोणी तरी मासे सोडले आहेत. त्या विहिरीतील पाणी पंप लावून साठवण टाकीमध्ये आणले जाऊ शकते,परंंतुु विहिरीतील मासे मारतील अशी काही ग्रामस्थांंंनी भीती व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीकडून कर्जत पंचायत समितीकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. त्या गावातील पाण्याच्या स्थितीची पाहणी तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी अधिकारी वर्गासह केली. संबंधित गावातील नळपाणी योजनेची साठवण टाकी दुरु स्त करून तसेच नळपाणी योजनेच्या मार्गावर जलवाहिनी दुरु स्त करून कमी अधिक प्रमाणात पाणी गावापर्यंत पोहचविणे आणि बोअरवेल खोदून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणे आदी उपायाबरोबर वर्षभरापूर्वी ओलमण गावात बैठक घेऊन सुचिवले होते. मात्र ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी यापैकी एकाही उपायाची पूर्तता केली नाही. त्यामुळे मागील १० वर्षाप्रमाणे यावर्षी देखील ओलमण गावत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
ओलमणमध्ये पाणीटंचाई !
By admin | Updated: May 4, 2015 23:52 IST