Join us

देवनार स्मशानभूमीत पाण्याची टंचाई

By admin | Updated: June 29, 2015 05:57 IST

शहरातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेने करोडो रुपयांचा निधी खर्च केला.

मुंबई : शहरातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेने करोडो रुपयांचा निधी खर्च केला. मात्र पालिकेच्याच स्मशानभूमीमध्ये पाणी येत नसल्याचा धक्कादायक प्रकार देवनार स्मशानभूमीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या रहिवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चेंबूरच्या घाटला गाव, देवनार, बीएआरसी, बीपीटी कॉलनी आणि मानखुर्द या परिसरातील रहिवाशांसाठी देवनार गावातील ही एकमेव हिंदू स्मशानभूमी आहे. पूर्वी या सर्व रहिवाशांना अंत्यविधीसाठी चेंबूरच्या चरई स्मशानभूमी येथे जावे लागत होते. मात्र या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागत असल्याने रहिवाशांच्या मागणीवरून २००८ मध्ये पालिकेने देवनार गाव परिसरात ही स्मशानभूमी बांधली. त्या वेळी येथे पालिकेकडून पाण्याचे कनेक्शन देण्यात आले. मात्र गेल्या महिनाभरापासून या स्मशानभूमीत पाणीच येत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांनी पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन तपासणी केली असता, येथील पाइपलाइन निकामी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर अद्यापही या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यात आलेला नाही. या स्मशानभूमी परिसरात पालिकेची कर्मचारी वसाहतदेखील आहे. या वसाहतीत १८ कुटुंबे राहत आहेत. त्यांच्याकडेही पाणी येत नसल्याने त्यांनादेखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र तीन-चार दिवसांनंतर एक टँकर येतो. त्यामुळे हाल होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. तर स्मशानभूमीमध्ये रोज तीन ते चार मृतदेह अंत्यविधीसाठी येत असतात. त्यामुळे अंत्यविधीनंतर हातपाय धुण्यासाठी या ठिकाणी पाणीच नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. याबाबत परिसरातील मनसे नेते राजेंद्र नगराळे यांनी पालिकेला पत्र लिहून तत्काळ हा पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)एका दिवसाचे काम स्मशानभूमी पासून पालिकेची मुख्य पाईपलाईन केवळ शंभर मीटरवर आहे. त्यामुळे ही पाईपलाईन बदलल्यास येथील पाणीप्रश्न तत्काळ सुटणार आहे. यासाठी केवळ एकच दिवसाचा अवधी लागेल. मात्र काही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे याठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचा आरोप काही रहिवाशांनी केला आहे.