जव्हार : या शहराला पाणीपुरवठा करणारा जयसागर हे एकमेव धरण बऱ्यांच अंशी गाळाने भरल्याने व ते ५४ वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येसाठी बांधलेले असल्याने आता ते कमी पडत असून जव्हारकरांवर पाणीटंचाईचे संकट कोळसले आहे. हे धरण जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांनी १४ सप्टेंबर १९६१ रोजी बांधून नगरपरिषदेकडे हस्तांतरीत केला. परंतु त्याची निर्मिती करताना ५४ वर्षापूर्वीची जव्हारची लोकसंख्या गृहीत धरून तो बांधण्यात आला होता. ५४ वर्षात जव्हारची लोकसंख्या अनेक पटीने वाढली. शहराचा विस्तार होवून नागरीकरण वाढले त्यामुळे संपूर्ण शहराला पुरेसा असा दोन वेळचा पाणीपुरवठा वर्षभर होऊच शकत नाही. ५४ वर्षाच्या काळात अनेक सत्तांतरे झाली परंतु पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे कोणीही लक्ष देऊन पाणीपुरवठ्याचा अन्य स्त्रोत निर्माण होईल, असा प्रकल्प निर्माण न केल्यामुळे दिवसेंदिवस जव्हारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पूर्वी शहरात अनेक ठिकाणी हातपंपाची देखील सोय होती. परंतु देखभाल व दुरूस्ती अभावी आजमितीस शहरातील सर्व हातपंप बंद असल्याने नागरीकांना केवळ नगरपरिषदेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.नगरपरिषद प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा फटका जव्हार ग्रामीण रूग्णालयातील शेकडो रूग्णांना देखील सहन करावा लागतो. २०० खाटांच्या या ग्रामीण रूग्णालयात तेवढेच रूग्ण तालुक्याच्या तसेच शहराच्या विविध भागातून भरती होतात. तपासणीसाठी रोज शेकडो रूग्ण येत असतात. मात्र त्यांना पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र पाईपलाईन बंद असल्यामुळे दोन छोट्या टँकरवरच त्यांना अवलंबून राहावे लागते. हे पाणी केवळ एक तासातच संपून जाते. त्यामुळे रूग्णालयाला रोज किमान पाण्याचे पाच टँकर देण्याची मागणी पंचायत समिती सदस्या ज्योती भोये यांनी केली आहे. संभाव्य भीषण पाणीटंचाई बाबत जव्हार मुख्याधिकारी वैभव विधाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेत पाणीपुरवठा प्रमुख राम पिंपळे यांना पाईप लाईन दुरूस्ती करणे, पाण्याचा व्यावसायीक व्यापाऱ्यांना नोटीस देणे तसेच ग्रामीण रूग्णालयास पाणी संपल्यास तात्काळ पाणी देण्याच्या सूचना दिल्या. (वार्ताहर)