Join us  

मुंबईतील लोकलवर सीसीटीव्हीची नजर!, गार्ड करणार मॉनिटरिंग

By महेश चेमटे | Published: November 11, 2017 6:36 AM

उपनगरीय लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकलच्या बोगीत सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने सर्व लोकल बोगींमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे

मुंबई : उपनगरीय लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकलच्या बोगीत सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने सर्व लोकल बोगींमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. सर्व बोगींत सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासह, त्याचे मॉनिटरिंग करण्याच्या यंत्रणेचादेखील समावेश या प्रस्तावात आहे. एका रॅकसाठी सुमारे एक कोटी अपेक्षित आहे, तर सीसीटीव्ही मॉनिटरिंगची जबाबदारी गार्डवर सोपविण्यात येणार आहे.एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व लोकल बोगींत सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याची घोषणा केली होती. सीसीटीव्ही हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असल्यामुळे, हे काम तत्परतेने पूर्ण करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले होते. मध्य रेल्वेने उपनगरीय लोकल बोगींत सीसीटीव्ही प्रस्तावासाठी हालचाली सुरू केल्या. १५ ते २० दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने सीसीटीव्हीचा प्रस्ताव सादर केला.तथापि, रेल्वे बोर्डाकडून संपूर्ण बोगींत सीसीटीव्ही कॅमेरे आणि गार्ड कक्षात मॉनिटरिंग करणारी यंत्रणा, असा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या धर्तीवर मध्य रेल्वेने नवीन प्रस्ताव तयार केला. जुन्या प्रस्तावात एका रॅकसाठी ५० ते ५५ लाख खर्च अपेक्षित होता. यात लाइव्ह रेकॉर्डिंगची सुविधा नव्हती. मात्र, नव्या प्रस्तावात ‘लाइव्ह’ यंत्रणेचा समावेश करण्यात आला आहे. याचे मॉनिटरिंग गार्ड करणार असून, यासाठी एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे.हा प्रस्ताव शुक्रवारी मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.१ कोटींचा खर्च अपेक्षितलोकलमधील सीसीटीव्हीच्या प्रस्तावात ‘लाइव्ह’ यंत्रणेचा समावेश आहे. याचे मॉनिटरिंग गार्ड करणार असून, यासाठी एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे.मध्य रेल्वेवर एकूण १२८ रेक (१२-बोगींची ट्रेन) आहेत. यापैकी मध्य मार्गावर ७९ रॅक आहेत. यात सिमेन्स बनावटीच्या ७२ रॅक, भेल बनावटीच्या ६ आणि सिमेन्स १५ डब्यांचे एक रॅक यांचा समावेश आहे, तर हार्बर मार्गावर एकूण ३८ रॅक प्रवाशांच्या सेवेत आहेत. यात सिमेन्स बनावटीच्या २७ आणि रेट्रो बनावटीच्या ११ रॅक आहेत.ट्रान्स हार्बर मार्गावर रेट्रो बनावटीच्या ५ आणि जुन्या रॅकमध्ये डीसीएसी यंत्रणा बसविलेल्या ६ अशा एकूण ११ रॅक आहेत.

टॅग्स :मुंबईमुंबई उपनगरी रेल्वे