Join us

पर्यटनक्षेत्रे विकासाच्या प्रतिक्षेत

By admin | Updated: October 9, 2014 23:09 IST

मुंबई, पुणे, गुजरात राज्यातील हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा डहाणू, बोर्डी, चिंचणीचा सुंदर आणि स्वच्छ अशा समुद्रकिनाऱ्याचा विकास व्हावा म्हणून गेल्या पाच वर्षात पाच वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले आहे

शौकत शेख, डहाणूमुंबई, पुणे, गुजरात राज्यातील हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा डहाणू, बोर्डी, चिंचणीचा सुंदर आणि स्वच्छ अशा समुद्रकिनाऱ्याचा विकास व्हावा म्हणून गेल्या पाच वर्षात पाच वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. परंतु पर्यटनस्थळ म्हणून मंजुरी मिळालेल्या बोर्डी पर्यटन केंद्राला अद्यापही निधी मंजुर होत नसल्याने हजारो पर्यटकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने डहाणू तालुक्यातील या किनाऱ्याचा विकासासाठी पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्यास या भागात रोजगार आणि स्थानिकांच्या उत्पन्नाचे साधन खुल होईल अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.महाराष्ट्र राज्याला एकुण ७२० कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यापैकी सुमारे ३२० कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा हा एकट्या ठाणे जिल्हयाला लाभलेला आहे. त्यातील ५० कि. मी. समुद्रकिनारा डहाणू तालुक्यात येतो. डहाणू तालुक्याला चिंचणी ते झाई गावापर्यंत प्रचंड मोठा किनारा असून यापैकी बोर्डीतील किनारा खुपच नयनरम्य असल्याने वर्षभरातील सुट्टीच्या दिवसात शिवाय दिपावली, दसरा, रमजानईद इ. सणासुदीच्या दिवसात मुंबई, पुणे, गुजरात राज्यातील हजारो पर्यटक येथे येत असतात. परंतु आतापर्यंत बोर्डीतील समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालेला नाही. येथील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. येथे गार्डन, शौचालय, बाथरूम सारखी व्यवस्था नसल्याने शिवाय स्ट्रिटलाईट, पिण्याचे पाणीची कमतरता असल्याने पर्यटकांची गैरसोय होत असते. दरम्यान महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील अनेक दुर्लक्षीत पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी शेकडो कोटीचा निधी मंजुर केला आहे. परंतु आश्चर्य म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून मंजुरी मिळालेल्या बोर्डी पर्यटन क्षेत्राला अद्यापही निधी मंजुर झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. पर्यटकांना दर्जेदार व अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्यास निश्चितच डहाणूतील पर्यटनामध्ये वाढ होईल. त्यामुळे स्थानिक विकासालाही चालना मिळून प्रगती साधली जाईल.