रत्नागिरी : लष्करी सेवेत कार्यरत असताना अपघात झाला. नोकरीतून बाहेर पडावे लागले. पण सेवेचा एकूण कालावधी लक्षात घेऊन वरच्या पदाचे निवृत्तिवेतन मात्र मिळाले नाही. गेल्या जवळजवळ १८ वर्षे यासाठी झगडणारे निवृत्त कॅप्टन अनंत निकम अजूनही आपल्या मागणीसाठी झगडतच आहेत. कॅप्टन म्हणून निवृत्तिवेतन मिळण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे १२ आॅगस्ट रोजी ते उपोषण करणार आहेत. कॅप्टन अनंत लक्ष्मण निकम, (रा. कुळवंडी, वडाचीवाडी, ता. खेड) हे गेल्या १५ वर्षांपासून आर्मीच्या प्रशासकीय यंत्रणेसमोर न्याय मिळविण्यासाठी धडपडत आहेत. ७ वर्षे सेवा झाल्यानंतर आर्मीच्या कॅम्पसमध्ये त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. निकम हे हाताला व डोक्याला गंभीर मार बसल्याने जखमी होऊन अपंग झाले. निकम १९८५ पासून लष्करीसेवेत कार्यरत होते. १९९२ मध्ये सेवा बजावत असताना अपघात झाला. त्यांनी १९९४ मध्ये निवृत्ती वेतनासाठी अर्ज दाखल केला. परंतु त्यावेळी तो फेटाळण्यात आला होता. न्यायालयाकडे निकम यांनी याचिका सादर केल्यानंतर सेवेत असताना झालेल्या अपघातामुळे निवृत्तिवेतन देण्याचा निकाल दिला. निकम हे सेवेत असताना त्यांना कॅप्टन म्हणून पदोन्नत्ती मिळाली होती, असा त्यांचा दावा आहे. मात्र, शासनाकडून पत्रव्यवहार करताना २००५ पर्यंत निवृत्त कॅप्टन असा होत होता. परंतु आता शिपाई म्हणून केला जात आहे. शिवाय निवृत्तिवेतन शिपायाचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवृत्त कॅप्टनचे निवृत्तिवेतन मिळावे, अशी निकम यांनी वारंवार मागणी करूनही त्याची दखल घेतली न गेल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आर्मीच्या पेन्शनर विभागाने निकम यांना आजपर्यंतची पेन्शनची रक्कम व त्यावरील व्याज द्यावे. उर्वरित रक्कम व्याजासह द्यावी, असे आदेश ३ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन न्यायाधीश आर. एम. सावंत यांनी दिले होते. ही रक्कम कोट्यवधीच्या घरात जाते. मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कलम २१नुसार निकम हे पेन्शन मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायालयाने त्यावेळी सांगितले होते. तरीही या सर्व घडामोडींची दखल आर्मीच्या व्यवस्थापनाने न घेतल्याने निकम यांनी १२ आॅगस्ट २०१४ रोजी दिल्ली येथील जंतरमंतर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)
निवृत्त सैनिकाला निवृत्तिवेतनाची प्रतीक्षा
By admin | Updated: August 7, 2014 00:25 IST