Join us  

‘हिमालय’ पुनर्बांधणीला ‘ना हरकत’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 2:42 AM

पुरातत्त्व विभागाचे प्रमाणपत्र । पुलाअभावी प्रवाशांना ओलांडावा लागणार रस्ता

मुंबई : स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या पुलांचे एका पाठोपाठ एक पुनर्बांधणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्याच वेळी वर्षभरापूर्वी कोसळलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल बांधण्याबाबत अद्याप निर्णयही होऊ शकलेला नाही. पुलाच्या बाजूच्या परिसरात पुरातन वास्तू असल्याने, पूल बांधण्यासाठी महापालिकेला राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच या पुलाबाबत स्पष्टता येणार आहे. तोपर्यंत मध्य रेल्वेच्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागणार आहे.

१४ मार्च, २०१९ रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत सात प्रवाशी मृत्युमुखी, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर या पुलाचा उर्वरित सांगाडाही धोकादायक ठरल्यामुळे महापालिकेने पाडला. डॉ. डी. एन.रोडवर दुतर्फा सिग्नल बसवून टाइम्स इमारतीच्या दिशेच्या प्रवेशद्वारातून प्रवाशांना प्रवेश देण्यात आला. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अद्याप तेथे नवीन पूल उभारण्यात आलेला नाही. या मार्गावर दररोज दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते. सबवेतून जायचा वेळ वाचविण्यासाठी बऱ्याच वेळा प्रवाशी रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.हा पूल टाइम्सची इमारत आणि अंजुमन ए इस्लाम या पुरातन वास्तूच्या शेजारी आहे. त्यामुळे पूल उभारणीचा या वास्तूंना काही धोका निर्माण होईल का? यासाठी पुरातन वास्तू समितीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यासाठी महापालिकेच्या पूल विभागाने गेल्या आठवड्यात पुरातत्त्व विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर, पुलासाठी तीन आराखडे तयार करण्यात आले आहेत. यापैकी पुरातत्त्व विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेल्या आराखड्यानुसार पुलाच्या पुनर्बांधणीच्या खर्चाचा अंदाज घेण्यात येणार आहे. त्यानंतर, निविदा मागवून ठेकेदार नियुक्त करण्यात येणार असल्याने हा पूल कधी पूर्ण होईल, याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही.१४ मार्च रोजी हिमालय पूल कोसळला होता. धोकादायक असलेल्या या पुलाची किरकोळ दुरुस्ती स्ट्रक्चरल आॅडिटर डी.डी. देसाई यांनी सुचविली होती. या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व तीनशे पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल आॅडिट झाले. त्यात २१ पूल धोकादायक असल्याचे आढळून आले. त्यानुसार, या पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मात्र, पुलांच्या पुनर्बांधणीत दिरंगाई झाल्यामुळे खर्च वाढला आहे.पूल पुनर्बांधणीबाबत निर्णय घेण्यापूर्वी डॉ. डी. एन. रोडवरून दररोज किती गाड्या जातात, सीएसटीएम स्थानकात दररोज येणारे प्रवासी किती? याचा अभ्यास वाहतूक विभागामार्फत करण्यात आला होता.

टॅग्स :मुंबई