Join us  

स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 1:54 AM

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अंधेरी(प.) पासून ७ किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

मनोहर कुंभेजकर।मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अंधेरी(प.) पासून ७ किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील सुमारे ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत, तुरुंगवास भोगला. यामध्ये येथील कोळी महिलांनीदेखील सहभाग घेतला होता. मात्र, आजही येथे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्यात आलेले नाही. दरम्यान, वेसावे गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विष्णू राघो कोळी (टेलर) यांचे नुकतेच राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. वेसाव्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांपैकी शेवटचा बुरूज ढासळला.७१वा स्वातंत्र्य दिन देशात साजरा होणार आहे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतला होता. आता येथील एकही स्वातंत्र्य सैनिक हयात नाहीत. मात्र, त्यांचे साधे स्मारक अजून वेसाव्यात उभारण्यात आले नाही, अशी खंत कोळी समाजाचे अभ्यासक भगवान भानजी यांनी व्यक्त केली. आजच्या तरुण पिढीला आणि मुंबईकरांना त्यांची महती समजावी, यासाठी येथील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक समुद्रकिनारी असलेल्या वेसावे स्मशानभूमीच्या ४५०० चौ.फूट मोकळ्या जागेवर झाले पाहिजे, अशी मागणी येथील माजी नगरसेवक मोतीराम भावे यांनी केली होती, अशी माहिती त्यांचे चिरंजीव पंकज भावे यांनी दिली.माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची येथील समुद्रकिनारी ११ नोव्हेंबर १९४५ साली सभा झाली होती. त्या वेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील, अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी केली होती. येथील पोशा नाखवा यांना ब्रिटिशांनी ‘टायगर आॅफ वर्सोवा’ अशी उपाधी दिली होती. त्यांच्या नावाने यारी रोड येथे पालिकेची शाळा आहे.