Join us  

अभियांत्रिकी परीक्षेची बनावट वेळापत्रके व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 4:13 AM

मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी शाखेच्या विविध परीक्षा सुरू असून, प्रथम वर्ष सत्र २ व द्वितीय वर्ष संगणक शाखा सत्र ४ च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी शाखेच्या विविध परीक्षा सुरू असून, प्रथम वर्ष सत्र २ व द्वितीय वर्ष संगणक शाखा सत्र ४ च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर आहेत. विद्यार्थ्यांनी या बनावट वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.काही दिवसांपासून समाजमाध्यमावर अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र २ व द्वितीय वर्ष संगणक शाखा (चॉईस बेस) सत्र ४च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके फिरत आहेत. यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत असून महाविद्यालये व विद्यापीठाकडे याबाबत विचारणा करीत आहेत. यामुळे यासंदर्भात विद्यापीठाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र २ विद्यापीठाकडून १४ मार्च २०१९ रोजी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र २ या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले होते. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही परीक्षा ९ मेपासून सुरू झाली आहे व ती ७ जूनपर्यंत चालणार आहे. आतापर्यंत या अभ्यासक्रमाचे तीन पेपर झाले आहेत. उर्वरित तीन पेपर २७ मे व ३१ मे रोजी असून शेवटचा पेपर ७ जून रोजी होणार आहे. बनावट वेळापत्रकामध्ये ३१ मे रोजी होणारा कम्युनिकेशन स्किल्स या विषयाचा पेपर २९ मे रोजी दाखविण्यात आलेला आहे, तसेच ७ जून रोजी होणारा इंजिनीअरिंग ड्रॉइंग हा पेपर ३१ मे रोजी दाखविण्यात आलेला आहे. तसेच बनावट वेळापत्रक २३ मे रोजी प्रसिद्ध केल्याची तारीख आहे.द्वितीय वर्ष संगणक शाखा (चॉईस बेस) सत्र ४ तसेच अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्ष संगणक शाखा (चॉईस बेस) सत्र ४ ही परीक्षा ७ मेपासून सुरू झाली आहे व ती २९ मेपर्यंत चालणार आहे. आत्तापर्यंत ४ पेपर झाले असून उर्वरित एक शेवटचा पेपर २९ मे रोजी होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही बनावट तयार केलेले आहे. बनावट वेळापत्रकामध्ये २९ मे रोजी होणारा आॅपरेटिंग सिस्टीम या विषयाचा पेपर २७ मे रोजी दाखविण्यात आलेला आहे. तसेच हे बनावट वेळापत्रक २२ मे रोजी प्रसिद्ध केल्याची तारीख आहे. प्रत्यक्षात विद्यापीठाच्या अधिकृत वेळापत्रकात २९ मे रोजी ऑपरेटिंग सिस्टीम हा पेपर आहे.