Join us  

मुुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा ‘विनोद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:50 AM

सोशल मीडियावर मेसेजेसना उधाण : आठवडाभरापूर्वी मुलाखती होऊनही अद्याप नाव गुलदस्त्यात

मुंबई : कुलगुरू पदासाठी मुलाखती होऊन आठवडा उलटला; मात्र अद्याप मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित झाले नाही. कुलगुरू निवडीची अंतिम अधिकृत घोषणा अद्याप न झाल्याने आधी आपापल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावाने कुलगुरूंचे मेसेजेस सोशल मीडियावर फिरले. त्यानंतर आता कहर म्हणजे कुलगुरू निवडीवरून विनोदाचे मेसेजेसही सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया विनोदाचा विषय झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.कुलगुरूंच्या मुलाखती होऊन इतके दिवस उलटल्यानंतरही कुलगुरूंची निवड होत नाही. यावरून सरकार आणि राज्यपालांमध्ये असलेले मतभेद उघडपणे जाहीर होत असून, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मतही व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून, कुलगुरू निवडीत राजकीय हस्तक्षेपाची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. एकीकडे कुलगुरू स्पर्धेत देवानंद शिंदे यांच्या नावाची चर्चा असताना आपण कुलगुरू पदासाठी अर्जच केलेला नसून आपण या शर्यतीत नाही असे त्यांनी बुधवारी आॅनलाइन मूल्यांकनाबाबत सादरीकरण करताना सांगितले. तसेच प्रभारी कुलगुरू म्हणून आपली ही शेवटची पत्रकार परिषद असल्याचे सांगत सर्व चर्चांना पूर्णविरामही दिला. तर दुसरीकडे मुंबईचे सुहास पेडणेकर आणि नागपूरचे प्रमोद येवले यांच्या नावांची चर्चा मात्र अद्याप सुरूच आहे.अधिकृत घोषणेकडे लक्षमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोण विराजमान होणार यावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे एकमत होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय घ्यावा, मात्र तेही होत नसेल तर हे गंभीर असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आणखी किती दिवस प्रभारी खांद्यांवर जबाबदारी सोपवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जाणार आहे, असे सवालही यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, अद्यापही कुलगुरू निवडीबाबत काहीच प्रगती नसल्याची माहिती राजभवनाकडून मिळत आहे. त्यामुळे राजभवन याबाबत अधिकृत घोषणा केव्हा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठ