Join us  

ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ५० आणि ६० च्या दशकात सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ५० आणि ६० च्या दशकात सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य (९८) यांचे आज (बुधवार, १६ जून) सकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास अंधेरी येथील घरी निधन झाले. ज्युनिअर आर्टिस्ट ते अभिनेता असा त्यांचा प्रवास अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

चंद्रशेखर यांचे पुत्र अशोक यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी, १० जून राेजी ताप आल्याने त्यांना जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप उतरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. आयुष्यातील अखेरचे क्षण कुटुंबीयांसोबत घालविण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे घरात रुग्णालयासारखी व्यवस्था तयार करण्यात आली होती.

हैदराबाद येथे जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी ५० च्या दशकात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनय कौशल्याच्या जोरावर अल्पावधीतच त्यांनी दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले. व्ही. शांताराम यांनी ‘सुरंग’ (१९५३) या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यांनतर अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करत त्यांनी २५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

‘काली टोपी लाल रुमाल’, ‘बिरादरी’, ‘स्ट्रीट सिंगर’, ‘रुस्तम-ए-बगदाद’, ‘कटी पतंग’, ‘बसंत बिहार’, ‘शराबी’, ‘गेट वे ऑफ इंडिया’, ‘फैशन’, ‘बरसात की रात’, ‘अंगुलीमाल’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होत. १९८५ ते ९६ या काळात त्यांनी सिने आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले होते.

* रामायण मालिकेने दिली नवी ओळख

दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ने चंद्रशेखर यांना नवी ओळख दिली. आर्य सुमंत या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. या मालिकेचे निर्माते रामानंद सागर त्यांचे जवळचे मित्र होते.

..............................................