Join us

वाहनांचे होणार ‘स्कॅनिंग’

By admin | Updated: January 9, 2017 07:14 IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सीएसटी स्थानकालाही दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर मुंबई उपनगरीय मार्गावरील स्थानकांची सुरक्षा कडेकोट करतानाच अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा

मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सीएसटी स्थानकालाही दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर मुंबई उपनगरीय मार्गावरील स्थानकांची सुरक्षा कडेकोट करतानाच अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा स्थानकांवर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सीएसटी स्थानकातील मेल-एक्सप्रेसच्या परिसरात चार चाकी वाहनांची खालील बाजूने संपूर्ण तपासणी करणारे युव्हीएसएस (अंडर व्हेयकल सिक्युरिटी सिस्टिम)यंत्रणा बसवण्यात आल्यानंतर आता एलटीटी व ठाणे स्थानकातही यंत्रणा बसवण्यात येईल. इंटीग्रेटेड सिक्युरिटी यंत्रणेव्दारे देशभरातील रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक अशी सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून वाहनांचे संपूर्ण तपासणी करणारे युव्हीएसएस बसवण्यात येत आहे. या यंत्रणेव्दारे स्थानकांमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची खालील बाजूने लेझर यंत्रणेव्दारे तपासणी केली जाते. यंत्रणेला एक कॅमेरा जोडलेला असतो आणि या कॅमेराव्दारे बाजूलाच असणाऱ्या संगणकावर वाहनाची माहिती मिळते. सीएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर यंत्रणा बसवण्यात आलेली असतानाच आणखी एलटीटी व ठाणे स्थानकातही ती बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. एलटीटीत दोन व ठाणे स्थानकात एक युव्हीएसएस बसेल. यासंदर्भात मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले की, लवकरच दोन स्थानकात युव्हीएसएस यंत्रणा बसवण्यात येईल. त्यानंतर आणखी काही स्थानकात यंत्रणा बसवण्याचा विचार आहे. यंत्रणा बसवण्यासाठी रॅम्पचीही आवश्यक्ता असते. तेही काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे सुरक्षेला आणखीच बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)